Lucknow Super Giants
मुंबई, 1 एप्रिल: इविन लुईस आणि आयुष बदोनीने लखनऊ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने(CSK) दिलेलं 210 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. लुइसने 23 चेंडूत 55 धावांची तुफान खेळी केली. आयुष बदोनीने दुसऱ्या टोकाकडून 19 धावा फटकावल्या. लखनऊच्या या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. या विजयानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सहाव्या स्थानावर आहे. एमएस धोनी, रवींद्र जडेजा यांसारख्या स्टार खेळाडूंची भर असलेली चेन्नई टीम दुसऱ्या पराभवानंतर आठव्या स्थानावर आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये 10व्या स्थानावर आहे. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स अजूनही अव्वल स्थानावर आहे. चेन्नई व्यतिरिक्त लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स चेन्नईनंतर 9व्या स्थानावर आहे. आयपीएलच्या 2 नवीन संघांबद्दल बोलायचे तर, लखनऊ व्यतिरिक्त, हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्स पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस अव्वल आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्लेसिस सर्वाधिक 93 धावांसह अव्वल स्थानावर आहे. प्लेसिसनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशन आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज वनिंदू हसरंगा पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 2 सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेचा फिरकीपटू पाठोपाठ कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आहे, ज्याने 2 सामन्यांत 4 बळी घेतले आहेत. दोन नवीन संघांच्या समावेशासह इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चे स्वरूप देखील बदलले गेले आहे. संघाना प्रत्येकी 5 च्या गटात विभागले गेले आहेत. सर्व 10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळतील. आणि जुन्या फॉरमॅटनुसार प्रत्येक संघ एका संघांविरुद्ध चार आणि पाच संघांविरुद्ध दोनदा खेळेल. यानंतर 2022 लीग टप्प्यातील सर्व सामने संपले की अव्वल चार संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. IPL 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाईल, तर ही ‘महा’ स्पर्धा एकूण 65 दिवस चालणार आहे.