मुंबई, 15 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज पार पडणार आहे. या वनडे मालिकेत आतापर्यंत भारताने दोन सामने जिंकले असून मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. या दोन विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका जवळपास खिशात घातली असून आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघ श्रीलंकेवर भारी पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 मालिकेत देखील भारताने श्रीलंकेवर 2-1 ने विजय मिळवून मालिका विजय प्राप्त केला होता. श्रीलंका विरुद्ध वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व हे रोहित शर्माकडे आहे. भारतीय संघाला या मालिकेनंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध देखील टी 20 आणि वनडे मालिका खेळायच्या असल्याने आज श्रीलंके विरुद्ध तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात शुभमन गील आणि ईशान किशन या दोघांना प्लेयिंग ११ मध्ये स्थान देण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे. या ऐवजी भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. हे ही वाचा : बाउंड्रीबाहेर गेला नाही चेंडू तरी मिळाला सिक्स, बीग बॅश लीगमधला व्हिडीओ व्हायरल कुठे होणार सामना : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना हा तिरुअनंतपुरम येथील ग्रीन फिल्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरु होणार असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. कुठे पाहाल सामना : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार तिसरा वनडे सामना हा प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच डिझनी हॉट्स स्टारवर या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येईल. वन -डे मालिकेसाठी संघ : भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, ईशान किशन, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.