भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द
ब्रिस्बेन, 19 ऑक्टोबर: ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर भारत आणि न्यूझीलंड संघात वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीआधी आज अखेरचा सराव सामना होत आहे. पण पावसामुळे हा सामना नियोजित वेळेत सुरु झालेला नाही. याच स्टेडियमवर आज सकाळी झालेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा सामना पावसामुळे थांबवण्यात आला. अफगाणिस्तानची इनिंग संपल्यानंतर पाकिस्तानी संघ बॅटिंगसाठी मैदानात उतरला. पण पावसाचा जोर वाढल्यानं अम्पायर्सनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड सामन्यावरही अनिश्चिततेचं सावट होतं पण अखेर हाही सामना एकाही बॉलचा खेळ न होता रद्द झाला. या सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार 4.16 वाजताचा कट ऑफ टाईम देण्यात आला होता. त्याआधी सामन्याला सुरुवात झाल्यास किमान 5-5 ओव्हर्सचा खेळ शक्य होतं. पण त्यानंतरही पावसाचा गोंधळ सुरुच राहिल्यानं हाही सामना पावसामुळे वाया गेला. पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना रद्द आज सकाळच्या सत्रात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सराव सामना रंगला. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 154 धावा केल्या. कॅप्टन मोहम्मद नबीनं 51 धावा केल्या तर इब्राहिम झादराननं 35 धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं आपला चार ओव्हरचा कोटा पूर्ण करताना 29 धावात दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पहिल्या सराव सामन्यात विश्रांती घेतलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाननं पाकिस्तानच्या डावाला सुरुवात केली. पण केवळ 2.2 ओव्हर्सचा खेळ होताच पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरुच राहिल्यानं मग अम्पायर्सनी खेळ रद्द केला.
सरावाची अखेरची सधी हुकली टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पहिली लढत रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. या लढतीआधी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध सरावाची ही शेवटची संधी होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे ही संधी वाया गेली. हेही वाचा - T20 World Cup: विराटसोबत दिसणारी ही मुलगी कोण? सोशल मीडियात फोटो Viral महामुकाबल्यातही पाऊस? दरम्यान 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान संघात महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधला पहिलाच सामना असणार आहे. पण या महामुकाबल्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे.