मुंबई, 25 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. मीरपूरमध्ये झालेली ही दुसरी आणि अखेरची कसोटी रोमहर्षक अशी होती. आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी जरी भारतीय संघाला विजय मिळवून दिला असला तरी 145 धावांचे आव्हान गाठताना भारताची दमछाक झाली. संघ अडचणीत सापडलेला असताना अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी फिरकी गोलंदाजांचा सामना केला. या विजयानतंर दिग्गज क्रिकेटपटूंनी अश्विनच्या खेळीचं कौतुक केलं आहे. विरेंद्र सेहवागने ट्विटरवर अश्विनचा एक एडिटेड फोटो शेअर केला आहे. यात अश्विन एका प्रयोगशाळेत दाखवण्यात आलं आहे. सेहवागने म्हटलं की,“सायंटिस्टने करून दाखवलं. अश्विनने जबरदस्त खेळी केली आणि श्रेयस अय्यरसोबत चांगली भागिदारी केली.” श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी आठव्या गड्यासाठी 71 धावांची अभेद्य भागिदारी केली. यासह त्यांनी भारताला बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 3 गडी राखून विजय मिळवून दिला. हेही वाचा : WTCच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, भारताला मोठा फायदा पण…
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेसुद्धा अश्विन आणि श्रेयस अय्यर यांचे कौतुक केले आहे. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला हैराण केले होते पण अश्विन आणि अय्यरने जबरदस्त फलंदाजी करत सामना जिंकून दिला.
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनेसुद्धा सोशल मीडियावरून अश्विन आणि अय़्यरच्या खेळीचं कौतुक केलं आहे. दबावात अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी जबरदस्त अशी भागिदारी केली. वेल डन इंडिया, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गाठण्याच्या एक पाऊल जवळ आहोत असं दिनेश कार्तिकने म्हटलं आहे. अश्विनचं कौतुक करताना काँग्रेस नेते शशी थरुर यांनी निवड समितीवर निशाणा साधला आहे. थरुर यांनी ट्विटरवर म्हटलं की, ‘भारतीय संघाला रोमहर्षक कसोटी सामन्यात विजय मिळाला. अश्विनने चांगली कामगिरी केली आणि मला भीती आहे की तो पुढच्या सामन्यातून बाहेर असेल." शशी थरुर यांचा रोख निवड समितीकडे होता, कारण पहिल्या कसोटीत सामनावीर पुरस्कार मिळवूनही कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत वगळण्यात आले. यावरूनच थरुर यांनी निवड समितीवर निशाणा साधलाय. हेही वाचा : अश्विनने टीम इंडियाला विजय मिळवून देत केला विक्रम, 34 वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड मोडलं भारताने 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी सकाळी तीन गडी लवकर गमावले. तेव्हा भारताची अवस्था 7 बाद 74 अशी झाली होती. यानंतर सामन्याची सूत्रे आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी हाती घेतली. अश्विनने 42 तर अय्यरने 29 धावांची खेळी केली. भारताने सामन्यासह मालिका 3-0 ने जिंकली. तसंच या मालिका विजयामुळे भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमधील आपले स्थान भक्कम केले आहे.