मुंबई, 25 डिसेंबर : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या आर अश्विनने महत्त्वाची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकली. आर अश्विनने त्याच्या या खेळीसह 34 वर्षे जुना विक्रमही मोडला. 9व्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. आर अश्विनने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात नाबाद 42 धावा केल्या. यासह त्याने कसोटीत यशस्वी पाठलाग करताना ९ व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर नोंदवला. याआधी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्स्टन बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 40 धावांची खेळी केली होती. अश्विनने त्याच्यापेक्षा दोन धावा जास्त केल्या आहेत. हेही वाचा : WTCच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, भारताला मोठा फायदा पण… कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावा आणि 400 पेक्षा जास्त विकेट घेण्याची अष्टपैलू कामगिरी रविचंद्रन अश्विनने केली. यासह तो कपिल देव, शेन वॉर्न यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. तसंच सर्वात कमी सामन्यात अशी कामगिरी करणारा तो रिचर्ड हॅडली यांच्यानंतर दुसरा क्रिकेटर ठरला आहे. रिचर्ड हॅडली यांनी 86 सामन्यात ही कामगिरी केली होती, तर अश्विनने 88 सामन्यात हा माईलस्टोन गाठला. आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्यात 8 व्या गड्यासाठी चौथ्या डावात 71 धावांची भागिदारी झाली. अय्यर आणि अश्विन यांची ही भागिदारी भारताकडून चौथ्या डावात 8 व्या गड्यासाठी झालेली मोठी भागिदारी ठरली आहे. याआधी 1932 मध्ये भारताच्या लाला अमर सिंह आणि लाल सिंह यांनी इंग्लंडविरुद्ध 74 धावा केल्या होत्या. विषेश म्हणजे भारताचा तो पहिलाच सामना होता. तर कपिल देव आणि शिवराम कृष्ण यांच्यात ७० धावांची भागिदारीही झाली आहे. हेही वाचा : IND vs BAN Test: अश्विन-अय्यर बनले संकटमोचक, टीम इंडियाचा विजय; मालिकेत क्लीन स्वीप आर अश्विनला या सामन्यात पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 2 विकेट मिळाल्या. तर फलंदाजी करताना पहिल्या डावात त्याने 12 धावा केल्या होत्या. चौथ्या डावात नाबाद 42 धावा करत संघाला विजय मिळवून देणाऱ्या अश्विनला सामनावीर पुरस्कार मिळाला. बांगलादेशच्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज अडकत असताना अश्विनने 42 धावांची महत्त्वाची खेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.