मुंबई, 24 डिसेंबर : टीम इंडियासाठी हे वर्ष खास राहिलं नाही, वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातही टीमच्या पदरी निराशा आली आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा एकही टेस्ट खेळायला उतरू शकला नाही. रोहितऐवजी बांगलादेश दौऱ्यासाठी केएल राहुलला टीमचं कर्णधार करण्यात आलं. मिरपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला विजयासाठी 145 रनची गरज आहे, पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा स्कोअर 45/4 एवढा झाला आहे. आता चौथ्या दिवशी उलटफेर होणार का भारत 2-0 ने सीरिज जिंकणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारताकडून 2014 साली टेस्ट करियरची सुरूवात करणाऱ्या केएल राहुलसाठी बांगलादेश दौरा निर्णायक ठरणार आहे. या दौऱ्यात त्याने टीमचं नेतृत्व तर चांगलं केलं पण बॅटिंगमध्ये तो सपशेल अपयशी ठरला. पहिल्या टेस्टमध्ये राहुलने 22 आणि 23 रन केले. तर दुसऱ्या टेस्टमध्ये तो 10 आणि 2 रन करून आऊट झाला. मागच्या 9 इनिंगमध्ये त्याने फक्त एकच अर्धशतक केलं आहे. तसंच याशिवाय कोणत्याही सामन्यात त्याला 30 रनही करता आल्या नाहीत. ओपनर म्हणून त्याला टीमला चांगली सुरूवातही देता आलेली नाही. टी-20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर चेतन शर्मा यांच्यासह निवड समितीला बरखास्त करण्यात आलं. नवीन निवड समिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात टेस्ट सीरिज खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून पुनरागमन करेल. तर शुभमन गिलनेही त्याचं स्थान निश्चित केलं आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये यशस्वी जयस्वालही रन करत आहे, त्यामुळे नवी निवड समिती राहुलऐवजी युवा खेळाडूंना संधी देऊ शकते.