ढाका, 24 डिसेंबर : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 145 धावांचे आव्हान मिळालं आहे. आशियाई खेळपट्ट्यांवर चौथ्या डावात फलंदाजी करणं कठीण असतं. भारतीय संघाची अवस्था तिसऱ्या दिवस अखेर 4 बाद 45 अशी झाली आहे. अद्याप विजयासाठी भारताला 100 धावांची गरज असून कोहली, पुजारा, केएल राहुल आणि शुभमन गिलसारखे 4 फलंदाज बाद झाले आहेत. सध्या नाइट वॉचमन अक्षर पटेल आणि जयदेव उनादकट हे दोघे नाबाद आहेत. दुसऱ्या कोसटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ तिसऱ्या दिवशी 231 धावा करू शकला. मीरपूरमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉबे या संघाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघालाही 100 धावांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेही वाचा : BBL : ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू वेडवर घातली एक सामन्याची बंदी, टीम पेनला 5 वर्षांनी संधी बांगलादेशकडून लिटन दासने 73 धावांची खेळी केली तर जाकिर हसनने 51 धावा काढल्या. बांगलादेशने पहिल्या डावात 212 तर भारताने 314 धावा केल्या होत्या. याच्या जोरावर भारताला 87 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानतंर बांगलादेशने दुसऱ्या डावात 231 धावा केल्या आणि 145 धावांचे आव्हान दिले. याआधी इंग्लंडला 2016 मध्ये 274 धावांचे आव्हान मिळाले होते तेव्हा त्यांचा संघ 164 धावात बाद झाला होता. तर 2018 मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला 204 धावा करताना 139 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. बांगलादेश कसोटी मालिकेत कर्णधार केएल राहुल आणि विराट कोहली हे फॉर्ममध्ये दिसले नाहीत. तर रोहित शर्मा दुखापतीमुळे दोन्ही सामन्यांना मुकला. पहिल्या कसोटीत केएल राहुलने 22 आणि 23 अशा धावा काढल्या. तर कोहलीने 1 आणि 17 धावा केल्या. दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात केएल राहुल केवळ 10 आणि 2 धावा करू शकला. तर विराट कोहली पहिल्या डावात 24 आणि दुसऱ्या डावात फक्त एका धावेवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा 6 आणि शुभमन गिल 7 धावा करून बाद झाला. नाइट वॉचमन जयदेव उनादकट 3 धावा आणि अक्षर पटेल 26 धावांवर नाबाद आहेत. बांगलादेशकडून फिरकीपटू मेहदी हसन मिराजने आतापर्यंत 3 गडी बाद केले आहेत. हेही वाचा : VIDEO : शर्टही काढ आता, विराटला मैदानातच आला राग; फलंदाजाला सुनावले शुभमन गिलने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 110 तर पुजाराने नाबाद 102 धावांची खेळी केली होती. भारतीय संघाने सामन्यात मोठा बदल करत फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटला संघात घेतलं होतं. कुलदीपने पहिल्या कसोटीत 40 धावा आणि 8 विकेटही घेतल्या होत्या. त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता. उनादकटला पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात एकच विकेट घेता आली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला हा निर्णय महागात पडण्याची शक्यता आहे.