मुंबई, 6 जानेवारी : गुरुवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या टी 20 मालिकेतील दुसऱ्यात सामन्यात भारताचा तब्बल 16 धावांनी पराभव झाला. या सामन्यात भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह याची खेळी पूर्णतः फ्लॉप ठरली. त्याने सामन्यातील 2 षटकात 5 नो बॉल टाकले, त्याची हीच खेळी भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. श्रीलंका विरुद्ध मालिकेच्या दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर आता नेटकरी अर्शदीपवर चांगलाच संताप व्यक्त करीत आहेत. अशातच त्याने क्रिकेट कारकिर्दीत कधीही नो बॉल न टाकणाऱ्या भारताच्या माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडूनही शिकावे असे म्हंटले जात आहे. मात्र कपिल देव यांनी कारकिर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही असे म्हंटले जात असले तरी हे खरे नाही. कपिल देव हे भारतीय क्रिकेट विश्वातील महान खेळाडूंपैकी एक आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. असे भारताचे माजी खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट ऑल राउंडर राहिलेले कपिल देव आज त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. कपिल देव यांच्याबद्दल बोलताना अनेकजण त्यांनी क्रिकेट कारकिर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही असा दावा करतात. परंतु यात कोणतेही सत्य नाही. कपिल देव यांचे स्कोर कार्डवर नजर टाकली तर 1994 मध्ये खेळली गेलेली सिंगल वर्ल्ड सिरीजच्या तिसऱ्या सामन्यात मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना नो बॉल टाकला होता. ईएसपीएन क्रिकइन्फ़ो वर उपलब्ध असलेल्या या स्कोअर बोर्डनुसार देव यांनी या सामन्यात मध्ये 2 नो बॉल टाकले होते. हेही वाचा : विराट-अनुष्काने वृंदावनात घेतला स्वामींचा आशीर्वाद, मुलगी वामिकाचा VIDEO VIRAL केवळ इतकेच नाही तर युट्युबवर उपलब्ध असलेल्या कपिल देव यांच्या कारकिर्दीतील पहिल्या टेस्ट सामन्यामध्येही देव यांनी नो बॉल टाकला होता. फ़ैसलाबाद येथे हा सामना खेळला गेला असून कपिल देव यांनी या सामन्यामध्ये पहिली ओव्हर टाकली होती. या ओव्हरमध्ये त्यांनी टाकलेल्या बॉलला अंपायरनी नो बॉल करार दिला होता. या सामन्याचा व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. कपिल देव यांची कारकीर्द : कपिल देव यांनी आपल्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत 134 कसोटी सामन्यांत 434 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्यांनी फलंदाजीमध्ये 8 शतके करताना 5248 धावा केल्या. ते कसोटीत 400 विकेट्स आणि 5,000 धावा करणारे एकमेव खेळाडू आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या कारकीर्दीत फक्त 20 नो बॉल टाकले आहेत. कपिल देव 184 कसोटी डावात कधीच धावबाद झाले नाहीत. हेही वाचा : गोलंदाजांच्या चुकांची प्रशिक्षक राहुल द्रविडने केली पाठराखण, पराभवावर दिली प्रतिक्रिया कपिल देव यांनी भारतीय संघासाठी 225 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 27.45 च्या सरासरीने 253 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये त्यांनी 95.07 च्या स्ट्राईक रेटने 3783 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा 200 विकेट्स प्राप्त केल्या आहेत.