पुणे, 06 जानेवारी : श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीवरून आता उलट सुलट चर्चा सुरू आहेत. वेगवान गोलंदाजांनी अनेक चुका केल्या. यावर प्रशिक्षक राहुल द्रविडने प्रतिक्रिया देताना त्यांची पाठराखण केली आहे. पुण्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाकडून 7 नो बॉल टाकले गेले. यात एकट्या अर्शदीपने 5 नो बॉल टाकले. हार्दिक पांड्याने नो बॉल हा गुन्हा असल्याचं म्हटलं. तर नो बॉलवरून सुरू झालेल्या चर्चेवर राहुल द्रविडने गोलंदाजांचे समर्थन केलं आहे. कोणालाही अतिरिक्त चेंडू टाकण्याची इच्छा नसते असं राहुल द्रविडने म्हटलं. भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात 3 वेगवान गोलंदाज खेळवले. तिघांनी 12 षटकात तब्बल 151 धावा दिल्या. हेही वाचा : पराभव झाला पण अक्षरने नोंदवला विक्रम; केली जडेजा, धोनी, कार्तिकला न जमलेली कामगिरी द्रविड म्हणाला की, कोणत्याही गोलंदाजाला वाइड किंवा नो बॉल फेकण्याची इच्छा नसते. टी20 मध्ये अशी चूक तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. आपल्याला युवा खेळाडूंसोबत थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. संघात बरेच युवा खेळाडू आहेत. विशेषत: गोलंदाज आहेत आणि ते तरुण आहेत. वाइड किंवा नो बॉलसारख्या चुका होऊन जातात. खेळाडू सुधारणा करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. आपण सर्वांना धैर्याने समजून घेण्याची गरज आहे. आम्ही त्यांना पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. तांत्रिकदृष्ट्या पाठींबा देण्याची आणि त्यांच्या पद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे असंही राहुल द्रविडने म्हटलं.
हेही वाचा : नो बॉल हा गुन्हा, हार्दिक पांड्या अर्शदीपवर भडकला; पराभवानंतर थेटच बोलला दुसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यानतंर फलंदाजीसुद्धा ढेपाळली. एका बाजूला गोलंदाजांनी धावांची खैरात केली. तर दुसऱ्या बाजूला आघाडीची फळी पूर्ण अपयशी ठरली. भारताकडून सर्वाधिक धावा अक्षर पटेल आणि त्यानतंर सूर्यकुमार यादवने केल्या. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. पण तरीही भारताला 16 धावांनी पराभूत व्हावं लागलं.