दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत
इंदूर, 4 ऑक्टोबर: आधी ऑस्ट्रेलिया आणि मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माची टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाला निघणार आहे. मिशन वर्ल्ड कप मोहिमेआधी टीम इंडियाला सरावासाठी 6 टी20 सामने मिळाले. या सहापैकी 4 सामने भारतीय संघानं जिंकले. त्यामुळे तोच आत्मविश्वास घेऊन भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या फ्लाईटमध्ये बसणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना आहे तो 23 ऑक्टोबरला. पण या वर्ल्ड कप मोहिमेत एका खेळाडूच्या बाबतीत रोहित शर्माला आता एक वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे. कारण या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या दोन्ही मालिकांमध्ये स्वत:ला दोन प्रकारे सिद्ध केलं आहे. कार्तिकचा रोल काय? 37 वर्षांचा दिनेश कार्तिक टीम इंडियाचा फिनिशर म्हणून सध्या चर्चेत आहे. गेल्या काही सामन्यात त्यानं ती भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या टी20 सामन्यात रोहितनं दिनेश कार्तिकला वरच्या क्रमांकावर बढती दिली. आणि कार्तिक चक्क चौथ्या नंबरवर बॅटिंगला आला आणि तोही पॉवर प्लेमध्ये. मग काय पॉवर प्लेमधल्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्सच्या कार्तिकनं पहिल्या बॉलपासूनच फायदा घेतला. त्यानं अवघ्या 21 बॉल्समध्ये 46 धावा फटकावल्या. त्यात 4 फोर आणि 4 सिक्सर्सचा समावेश होता. हेही वाचा - Ind vs SA T20: इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेची बाजी, पण वर्ल्ड कपआधी शेवटच्या पेपरमध्ये टीम इंडिया का झाली फेल? कार्तिकच्या या खेळीमुळे वर्ल्ड कपमध्ये आघाडीची फळी कोसळल्यास त्याला वरच्या क्रमांकावरही बढती देण्याबात संघव्यवस्थापन विचार करु शकतं. इतकच नाही तर पाच गोलंदाज घेऊन रोहितसेना मैदानात उतरली तर एकमेव विकेट किपर म्हणून दिनेश कार्तिकला प्राधान्य दिलं जाण्याची दाट शक्यता आहे.
बुमराच्या जागी कोण? रोहितनं दिलं उत्तर दरम्यान भारतीय संघ बुधवारी रात्री ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. पण यावेळी टीम इंडिया 14 खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करेल. दुखापतीमुळे जसप्रीत बुमरा वर्ल्ड कप मोहिमेतून आऊट झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोण हे अद्याप बीसीसीआयनं जाहीर केलेलं नाही. पण तिसऱ्या टी20 नंतर याबाबत रोहितनं विधान केलं. रोहितनं सांगितलं की ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं आहे.