सॅम करनची अफगाणिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी
पर्थ, 22 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कप मध्ये सुपर 12 फेरीच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंड आणि इंग्लंडनं विजयी सुरुवात केली. आधी किवी संघानं कांगारुंचा तब्बल 89 धावांनी धुव्वा उडवला. त्यानंतर इंग्लंडनं अफगाणिस्तानवर 5 विकेट्सनी मात केली. इंग्लंडच्या या विजयात चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू चमकला. सीएसके कडून खेळणाऱ्या आणि धोनीच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या युवा सॅम करननं या सामन्यात अफगाणिस्तानच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं आणि एक ऐतिहासिक कामगिरी केली. सॅम करननं घडवला इतिहास टी20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात इंग्लंडच्या एकाही गोलंदाजानं 5 विकेट्स घेतल्या नव्हत्या. पण अफगाणिस्तानविरुद्ध डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करननं नवा विक्रम प्रस्थापित केला. सॅमनं 3.4 ओव्हर्समध्ये अवघ्या 10 धावा देताना 5 विकेट्स काढल्या. इंग्लिश गोलंदाजानं टी20 वर्ल्ड कपमध्ये 5 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. सॅम करनच्या या कामगिरीमुळे अफगाणिस्तानचा संघ 112 धावात आटोपला. करनशिवाय स्टोक्स आणि मार्क वूडनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर इंग्लंडनं 113 धावांचं आव्हान 19 व्या ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. 5 विकेट्स घेणारा सॅम करन या सामन्यात सामनावीराचा मानकरी ठरला. हेही वाचा - Ind vs Pak: ‘या’ तिघांना रोखा, मॅच जिंका… पाहा पाकविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या मार्गातील 3 अडथळे
धोनीचा कम्प्लीट क्रिकेटर 2020 आणि 2021 या दोन आयपीएल सीझनमध्ये सॅम करन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. 2021 साली धोनीच्या संघानं चौथ्यांदा आयपीएल जिंकलं त्या विजयात सॅम करनचा मोठा वाटा होता. दरम्यान सॅम करनचा खेळ पाहून धोनीनं त्याला कम्प्लीट क्रिकेटर म्हटलं होतं.