विराट कोहली, रोहित शर्मा
नवी दिल्ली 15 ऑक्टोबर : ‘राग हा माणसाचा शत्रू आहे’, अशी शिकवण तुम्हाला शाळेत असताना मिळालेली असेल. रागात असलेली व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर सर्वसमावेशक विचार करू शकत नाही. त्यामुळे रागाच्याभरात तिच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते. काहीवेळा तर रागाच्या भरात त्या व्यक्तीच्या हातून एखादा गुन्हादेखील घडून जातो. तमिळनाडूमध्ये अशी एक घटना घडली आहे. तामिळनाडूतील धर्मराज नावाच्या व्यक्तीनं आपल्या मित्राचा (विघ्नेश) खून केल्याची घटना घडली आहे. खूनाच्या घटनेतील आरोपी भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा फॅन आहे तर मृत व्यक्ती सध्याचा कॅप्टन रोहित शर्माचा फॅन आहे. ही घटना घडल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीला अटक करा, असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तमिळनाडूतील मल्लूरमधील पी. विघ्नेश आणि धर्मराज नावाचे दोन मित्र मंगळवारी (11 ऑक्टोबर) रात्री सिडको इंडस्ट्रियल इस्टेटजवळ दारू पित क्रिकेटवर चर्चा करत होते. यापैकी धर्मराज हा क्रिकेटपटू विराट कोहली आणि रायल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) या आयपीएल टीमचा चाहता आहे. तर, पी. विघ्नेश रोहित शर्माचा चाहता होता. दोघांमधील चर्चेचं रुपांतर वादात झालं. हा वाद विकोपाला जाऊन धर्मराजने विघ्नेशच्या अंगावर दारूची बाटली आणि क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या विघ्नेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी धर्मराज घटनास्थळावरून पळून गेला. सिडको कारखान्यात कामावर जाणाऱ्या कामगारांना दुसऱ्या दिवशी सकाळी विघ्नेशचा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मराज बोलताना अडखळत बोलतो. त्याच्या या सवयीमुळे विघ्नेश त्याची कायम खिल्ली उडवत असे. घटना घडली त्यादिवशी दोघे मित्र क्रिकेटबद्दल चर्चा करत होते. या वेळी विघ्नेशनं धर्मराजची तुलना विराट कोहली आणि आरसीबी टीमच्या कामगिरीशी केली. ही गोष्ट सहन न झाल्याने संतापलेल्या धर्मराजने विघ्नेशचा खून केला.
या घटनेनंतर रोहित शर्माच्या फॅन्सनी सोशल मीडियावर ‘अरेस्ट कोहली’ हा हॅशटॅग सुरू केला. या गोष्टीला विराट कोहलीच्या फॅन्सनी जोरदार विरोध केला. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाची दिसून आली. “सॉरी विघ्नेश, आम्ही तुच्यासाठी एक साधा टॅगही ट्रेंड करू शकत नाहीत, आम्ही भित्रे आहोत,” असे ट्विट रोहित शर्माच्या चाहत्यांनी विघ्नेशसाठी केले होते. या ट्विट्स सोबत ‘अरेस्ट कोहली’ हा हॅशटॅश जोडण्यात आला होता. या प्रकारामुळे विराट कोहलीच्या फॅन्सनी ट्विटरवर कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट करण्यास सुरुवात केली. “भारताचा अभिमान असलेल्या विराट कोहलीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, या घटनेत विराट कोहलीचा काय दोष? रोहित शर्माचे फॅन्स सलमान खानसारख्या गुन्हेगार व्यक्तीच्या अटकेची मागणी का करत नाहीत?,” असे अनेक ट्विट कोहलीच्या फॅन्सनी केले आहेत. हेही वाचा - PCA अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; हरभजननं केले होते गंभीर आरोप दरम्यान, आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंची एकमेकांशी तुलना झाली आहे. मात्र, या तुलनेमुळे कधी कोणाचा जीव गेला नव्हता. त्यामुळे या घटनेनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पोलिसांनी विघ्नेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अरियालूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.