मुंबई, 14 ऑक्टोबर : आपल्या देशात क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे देशभरात क्रिकेट असोसिएशन्सचा मोठा व्याप आहे. प्रत्येक राज्याची स्वत:ची एक क्रिकेट असोसिएशन आहे, जिच्या माध्यमातून राज्याचा क्रिकेट कारभार बघितला जातो. मात्र, अलीकडील काळात या असोसिएशन्समध्ये राजकारण आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत आहेत. यामध्ये आता पंजाब क्रिकेट असोसिशनचाही (पीसीए) समावेश झाला आहे. पीसीएचे अध्यक्ष गुलजारसिंग चहल यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
टीम इंडियाचा माजी ऑफ स्पिनर हरभजनसिंगचं एक पत्र चहल यांच्या राजीनाम्यास कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. हरभजनने पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये गैरकारभार सुरू असल्याचे आरोप केले होते. गुलजार चहल यांनी मात्र, राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं आहे. झी न्यूजनं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
राज्यसभा खासदार असलेला हरभजन हा पीसीएचा मुख्य सल्लागार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हरभजनसिंगने पीसीएमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला होता. पीसीए सदस्य आणि जिल्हा युनिट्सला पाठवलेल्या पत्रात त्याने कोणत्याही पदाधिकाऱ्याचं नाव घेतलेलं नाही. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही हे पत्र पाठवलं होतं. त्यानंतर गुरुवारी (13 ऑक्टोबर) गुलजार इंदरसिंग चहल यांनी पीसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. चहल यांनी मे महिन्यात पदभार स्वीकारला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, पीसीए कौन्सिल आणि पंजाब सरकारने 39 वर्षीय चहल यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाब टाकला होता.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिज कधी होणार? BCCI कडून महत्त्वाचे अपडेट्स जाहीर
याबाबत हरभजनसिंगनं पीटीआयला सांगितलं की, 'पीसीएमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैरकारभार होत असेल तर तो मी खपवून घेणार नाही. या पुढे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होता कामा नये, याची मी काळजी घेईन. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पीसीएचं प्रतिनिधित्व कोण करणार? असा प्रश्न हरभजनला पत्रकारांनी विचारला होता. "मी पीसीएचं प्रतिनिधित्व करणार नाही. प्रतिनिधी कोण असेल याबाबत सदस्य निर्णय घेतील," असं उत्तर त्यानं दिलं
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुलजार चहल हे पीसीएच्या आजीवन सदस्य आणि वरिष्ठ ग्राउंड्समनशी केलेल्या गैरवर्तनामुळे चर्चेत आले होते. चहल यांचे वडील स्टेडियममध्ये फिरण्यासाठी गेले असता ग्राउंड्समनने त्यांना हटकलं होतं. ही बाब समजताच चहल यांनी ग्राउंड्समनशी गैरवर्तन केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Harbhajan singh