संदीप पाटील
मुंबई, 9 ऑक्टोबर: मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक येत्या 20 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी काल शरद पवार यांच्या गटाकडून अर्ज दाखल करण्यात आले. अध्यक्षपदाच्या शर्यतीत यावेळी एक मोठं नाव शर्यतीत असणार आहेत ते म्हणजे भारतीय संघाचे माजी कसोटीवीर आणि 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे शिलेदार संदीप पाटील. संदीप पाटील यांनी काल एमसीए अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला. त्यासोबतच पवार गटाच्या इतर सदस्यांनीही आपापले अर्ज दाखल केले. पण अर्ज दाखल करण्याच्या काही तासातच संदीप पाटील यांच्याविरोधात लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. हितसंबंधांच्या मुद्द्यावरुन तक्रार एमसीएच्या घटनेनुसार 38 (व) मध्ये कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच हितसंबंधांबाबतचा मुद्दा येतो. घटनेतील याच नियमाला धरुन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संजय नाईक यांनी संदीप पाटील यांच्याविरोधात तक्रार केली आहे. नाईक यांच्या म्हणण्यानुसार संदीप पाटील एमसीए अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अर्ज करण्यासाठी पात्र ठरु शकत नाहीत. घटनेनुसार त्यांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी संजय नाईक यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी 13 पानी तक्रार दिली आहे. संजय नाईक यांच्या तक्रारीत असं नमूद करण्यात आलं आहे की, ‘संदीप पाटील आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर सिलेक्शन कमिटीचे चेअरमन सलील अंकोला यांच्यात जवळचे नातेबसंबंध आहेत. पाटील यांचे अंकोला हे व्याही लागतात. संदीप पाटलांची सून ही सलील अंकोला यांची मुलगी आहे. त्यामुळे एमसीएच्या घटनेतील 38 (व) नियमानुसार संदीप पाटील अध्यक्षपदासाठी अर्ज करु शकत नाहीत’ असं संजय नाईक यांचं म्हणणं आहे.
पाटील यांनी काल दाखल केला होता अर्ज संदीप पाटील यांनी काल पवार गटाकडून अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. याशिवाय उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी तर सचिव पदासाठी अजिंक्य नाईक, संयुक्त सचिवपदासाठी गौरव पय्याडे तर खजिनदार पदासाठी जगदीश आचरेकर यांनीही आपले अर्ज भरले. 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत पवार गट विरुद्ध आशिष शेलार गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. हेही वाचा - T20 World Cup: ‘होय मी 100 टक्के फिट!’ वर्ल्ड कपआधी इंग्लंडच्या कॅप्टननं दिली सर्वांना वॉर्निंग, Video दरम्यान याआधी 1996 मध्ये संदीप पाटील ज्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते त्यावेळी ते एमसीएचे व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून विजयी झाले होते. यापूर्वी दिलीप वेंगसरकर आणि अजित वाडेकर यांनीही एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना निवडणूक जिंकता आली नव्हती.