मुंबई, 31 जानेवारी : रविवारी पारपडलेल्या आयसीसीच्या अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा दारुण पराभव करत, पहिल्या अंडर 19 महिला वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. कर्णधार शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने हा करिष्मा करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर सर्वस्थरातून भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचे कौतुक होत असतानाच आता बीसीसीआयतर्फे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हे ही वाचा : ऑस्ट्रेलिया सीरिजआधी विराट-अनुष्का पोहोचले ‘बाबां’च्या चरणी, पाहा PHOTO भारताच्या अंडर 19 वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचा सन्मान भारताचा माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याची माहिती दिली आहे.
उद्या बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 मालिकेतील शेवटचा सामना पारपडणार आहे. गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या हस्ते अंडर 19 वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचा सन्मान करण्यात येईल. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा सन्मान सोहोळा आयोजित केला जाणार आहे.
भारतीय अंडर 19 महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयने त्यांना 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका येथे वर्ल्ड कप खेळून भारताचा अंडर 19 महिला संघ आज मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर संपूर्ण संघ उद्या बुधवारी अहमदाबाद येथे सन्मान सोहोळ्यासाठी रवाना होईल.