बांगलादेशला 5 धावांची पेनल्टी
सिडनी, 27 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कप मध्ये सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघ आज सिडनीच्या मैदानात आमनेसामने आले. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 205 रन्स केले आणि बांगलादेशला 206 रन्सचं टार्गेट दिलं. पण दक्षिण आफ्रिकेच्या डावात बांगलादेशकडून एक मोठी चूक झाली आणि त्यामुळे बांगलादेशला 5 पेनल्टी रन्सचा भुर्दंड सहन करावा लागला. क्रिकेटच्या नियमांनुसार बॉलर बॉलिंग करत असताना फिल्डिंग टीमच्या कोणत्याही खेळाडूनं आक्षेपार्ह हालचाल करणं अवैध ठरतं. त्यामुळे नुरुल हसनच्या त्या कृतीमुळे अम्पायरनं दक्षिण आफ्रिकेला 5 धावा पेनल्टी स्वरुपात बहाल केल्या. नेमकं काय घडलं? दक्षिण आफ्रिकेच्या डावात 11व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. शाकिब अल हसनची ही ओव्हर बांगलादेशसाठी सर्वांत महागडी ठरली होती. त्यातच विकेट किपर नुरुल हसनने केलेल्या चुकीमुळे दक्षिण आफ्रिकेला आणखी 5 धावा मिळाल्या. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर शाकिब बॉलिंग मार्कवर असताना विकेट किपर नुरुलनं आपली पोझिशन बदलली. त्याची ही चूक अम्पायरच्या लगेच निदर्शनास आली. आणि लगेच अम्पायरनी या चुकीसाठी बांगलादेशला 5 धावांचा दंड ठोठावला.
क्रिकेटचा नियम काय सांगतो? क्रिकेटच्या लॉ बुकमध्ये 41 नंबरच्या लॉ बुकमध्ये अनफेअर प्ले या कृतीसाठी पाच धावांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. फिल्डिंग करताना एखादा खेळाडू जाणीवपूर्वक बॅट्समनचं लक्ष विचलित होईल अशी कृती करत असेल तर अम्पायर त्याला वॉर्निंग देईल आणि त्यासह फिल्डिंग टीमला 5 धावांचा दंड ठोठावण्यात येईल. हेही वाचा - Ind vs Ned: सेमी फायनलच्या दिशेनं एक पाऊल पुढे… सिडनीत नेदरलँडचा धुव्वा, टीम इंडिया टॉपवर दक्षिण आफ्रिकेची बांगलादेशवर मात दरम्यान दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात बांगलादेशचा 104 धावांनी धुव्वा उडवून वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय साजरा केला. या सामन्यात रायली रुसोचं शतक आणि क्विंटन डी कॉकचं अर्धशतक याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 205 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर एनरिच नॉकिया आणि तबरेज शम्सीच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव 101 धावातच आटोपला. नॉकियानं 4 तर शम्सीनं 3 विकेट्स घेतल्या. रुसोचं खणखणीत शतक दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज रायली रुसोनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं झळकावण्याचा पराक्रम गाजवला. भारत दौऱ्यातल्या इंदूर टी20त रुसोनं शतकी खेळी केली होती. त्यानंतर वर्ल्ड कपच्या मैदानात पहिल्याच सामन्यात खेळताना रुसोनं आज 109 धावांची खेळी केली. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातलं हे आजवरचं दहावं शतक ठरलं. तर रुसोनं आंतरराष्ट्रीय टी20त दुसऱ्या शतकाची नोंद केली. त्याच्या या खेळीत 7 फोर आणि 8 सिक्सर्सचा समावेश होता. रुसोसह अनुभवी क्विंटन डी कॉकनंही 63 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी साकारली.