मेलबर्न, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत धूळ चारली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. मेलबर्नवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव 182 धावांनी दारूण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान भक्कम केलं आहे. पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 78.57 पॉइंटसह अव्वल स्थानी आहे. इतर संघ ऑस्ट्रेलियाच्या जवळपासही नाहीत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टॉप 2 संघांमध्ये लंडनमधील ओव्हलवर अंतिम सामना होणार आहे. हेही वाचा : टीम इंडियातून वगळल्याने धवन नाराज? संघ निवडीनंतरची ती पोस्ट केली डिलीट दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फायदा झाला आहे. भारताने नुकतंच बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकली आहे. यासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने भारताचे स्थान आणखी भक्कम झाले. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 58.93 इतकी आहे. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या नंबरवर पोहोचली आहे. त्यांची विजयाची टक्केवारी 50 टक्के इतकी आहे. तर पॉइंट टेबलमध्ये श्रीलंका तिसऱ्या स्थानावर असून त्यांची विजयाची टक्केवारी 53.33 टक्के इतकी आहे. भारतीय संघाला श्रीलंकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळायची आहे. यात चार कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्यासह भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दावेदार ठरू शकतो. हेही वाचा : राहुल द्रविडला साईडलाईन केलं जाणार? समोर आला BCCI चा गेमप्लान! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा दुसरा हंगाम असून 2021 ते 2023 पर्यंत हा असणार आहे. कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामात न्यूझीलंडने विजेतेपद पटकावलं होतं. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा भारताला फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे.