मुंबई, 29 डिसेंबर : श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारताने संघाची घोषणा केली आहे. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी हा संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये हार्दिक पांड्याला टी20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचे कर्णधार पद असेल. बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यावेळी रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे तो एक वनडे आणि दोन कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. श्रीलंकेविरुद्ध 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो खेळणार आहे. यासाठी रोहित शर्माने सराव सुरू केला असून सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. हेही वाचा : राहुल द्रविडला साईडलाईन केलं जाणार? समोर आला BCCI चा गेमप्लान! दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून शिखर धवनला वगळण्यात आलं आहे. यानंतर शिखर धवनने एक भावूक पोस्ट केली आहे. यात त्याने म्हटलं की, “गोष्ट विजय किंवा पराभवाची नसते तर मनाची असते. काम करा आणि इतर गोष्टी देवावर सोडून द्या.” शिखर धवनने त्याची ही पोस्ट नंतर डिलिट केली आहे. मात्र त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होत असून त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत संघात असलेल्या धवनला फारशी चमक दाखवता आली नाही. त्याला तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ 7,8 आणि 3 अशा धावा करता आल्या होत्या. तर याआधी त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 72 धावा केल्या होत्या. हेही वाचा : नवीन वर्षात दिसणार नवी टीम इंडिया, पंत आणि राहुलबाबत आली मोठी बातमी शिखर धवन टी20 आणि कसोटी संघातून आधीच बाहेर आहे. आता या मालिकेत त्याची निवड न झाल्यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यंदाच्या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. त्याने 2022 मध्ये 688 धावा केल्या आहेत.