विराट इनिंगनंतर अनुष्काची पोस्ट
मुंबई, 23 ऑक्टोबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचा हीरो ठरला. विराटची 53 बॉल्समधली 82 धावांची खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. याच मॅचविनिंग इनिंगनंतर विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं विराटच्या या इनिंगची प्रशंसा केली आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये मॅच पाहतानाचे फोटो शेअर करताना म्हटलंय की तिच्या आयुष्यातला हा सर्वोत्तम सामना होता. मॅचनंतर अनुष्काची पोस्ट… अनुष्कानं इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय… ‘सुंदर… खूप सुंदर… आज तू अनेकांच्या आयुष्यात आनंद पेरलायस. आणि तोही दिवाळीच्या संध्याकाळी. तू एक खूप चांगला माणूस आहेस. तू जिद्दी आहेस आणि स्वत:वर तुझा जबरदस्त विश्वास आहे. मी असं म्हणेन की हा आतापर्यंत मी पाहिलेला सर्वोत्तम सामना होता. आपली मुलगी अजून खूप लहान आहे हे समजायला की तिची आई ओरडत इतक्या उड्या का मारत होती? पण तिला जेव्हा समजेल तेव्हा तिला कळेल की आपल्या बाबांनी कारकीर्दीतली सर्वोत्तम इनिंग खेळली होती. तेही एका कठीण काळानंतर. मला तुझ्यावर गर्व आहे. लव्ह यू विराट!’
आशिया कपपासून विराट सुपर फॉर्ममध्ये यूएईतल्या आशिया कपनंतर विराट कोहलीच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा ओघ सुरु झाला आहे. आशिया कपमध्ये त्यानं चारपैकी तीन सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. पण त्याआधी अनेक महिने विराट आपल्या फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या त्या कठीण काळात अनुष्कानं चांगली साथ दिली. आशिया कपआधी विराटनं एक मोठा ब्रेक घेतला होता. त्यावेळी त्यानं महिनाभर बॅटला हातही लावला नव्हता. त्याच्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत हे पहिल्यांदाच घडलं होतं. पण त्यानंतर एक वेगळाच विराट जगासमोर आला.
अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकून विराटनं तीन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवला. मग ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार फलंदाजी करत वर्ल्ड कपची चांगली तयारी केली. आणि आज वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात एक ‘विराट’ इनिंग करत किंग कोहलीनं करोडो क्रिकेट चाहत्यांची दिवाळी गोड केली.