शाहीन आफ्रिदी
ब्रिस्बेन, 19 ऑक्टोबर: शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानचा सध्याचा अव्वल गोलंदाज. गेल्या आशिया कपमध्ये हाच शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे संघाबाहेर होता. पण आता तो फिट होऊन टीममध्ये परतलाय. शाहीन आफ्रिदीनं इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात कमबॅक केलं. त्यानंतर आज अफगाणिस्तानविरुद्ध चार ओव्हरचा कोटा पूर्ण करुन आफ्रीदीनं आपला फिटनेस सिद्ध केला. पण याच सामन्यात त्याच्या बॉलिंगवर अफगाणिस्तानचा बॅट्ममन मात्र जायबंदी झाला. आफ्रिदीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अफगाणिस्तानच्या रहिमतुल्ला गुरबाजला दुखापत झाली. आफ्रिदीच्या यॉर्करनं गुरबाज जायबंदी उभय संघातल्या सराव सामन्यात शाहीन आफ्रिदी पहिली ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आला. त्याच्या पहिल्या 4 बॉलमध्ये केवळ एकच धाव निघाली. पण पाचव्या बॉलवर आफ्रिदीनं खतरनाक यॉर्कर टाकला. या यॉर्करनं थेट गुरबाजच्या शूजचा वेध घेतला. आफ्रिदीनं अपील केली आणि अम्पायरनं गुरबाजला आऊटही दिलं. पण बॉल लागल्यानं गुरबाज मैदानातच कळवळला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या एका खेळाडूनं गुरबाजला चक्क पाठीवर उचलून घेत मैदानाबाहेर नेलं.
गुरबाज हॉस्पिटलमध्ये गुरबाज हा अफगाणिस्तानचा महत्वाचा खेळाडू आहे. शनिवारी अफगाणिस्तानचा संघ सुपर 12 फेरीतली पहिली लढत खेळणार आहे. पण त्याआधी गुरबाजच्या रुपात अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. सामन्यानंतर गुरबाजला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या स्कॅनच्या रिपोर्टनंतरच त्याच्या दुखापतीचं स्वरुप कळू शकेल.
आफ्रीदीनं केली विचारपूस दरम्यान अफगाणिस्तानच्या इनिंगनंतर शाहीन आफ्रिदीनं गुरबाजची विचारपूस केली होती.
हेही वाचा - T20 World Cup: ब्रिस्बेनमध्ये पावसाचा खेळ; भारत-न्यूझीलंड सराव सामना रद्द, महामुकाबल्याचं काय होणार? पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना रद्द आज सकाळच्या सत्रात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातला हा सराव सामना रंगला होता. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 154 धावा केल्या. कॅप्टन मोहम्मद नबीनं 51 धावा केल्या तर इब्राहिम झादराननं 35 धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं आपला चार ओव्हरचा कोटा पूर्ण करताना 29 धावात दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पहिल्या सराव सामन्यात विश्रांती घेतलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाननं पाकिस्तानच्या डावाला सुरुवात केली. पण केवळ 2.2 ओव्हर्सचा खेळ होताच पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरुच राहिल्यानं मग अम्पायर्सनी खेळ रद्द केला.