मुंबई, 09 सप्टेंबर : घरात अनेक प्रकारच्या घटना घडतात. यातील काही शुभ तर काही अशुभ असतात. सर्व घटनांचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. घरामध्ये घडणाऱ्या काही घटना भविष्यात येणाऱ्या संकटांचे संकेत देतात. जर कुटुंबात किंवा तुमच्या आयुष्यात काही त्रास होणार असेल तर तुम्हाला आधीच काही संकेत मिळू लागतात. तुम्ही या गोष्टींकडे कधी लक्ष दिले नसेल, पण अचानक घरात अशा काही गोष्टी घडू लागतात, ज्या अशुभ मानल्या जातात. जसे की तुळस ही पवित्र वनस्पती अचानक सुकणे किंवा आरसा वारंवार (Sign of Money Crisis) तुटणे. या सर्व घटना घर आणि कुटुंबात काही मोठे संकट येण्याची चिन्हे असतात. ज्यामुळे तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घरामध्ये घडणाऱ्या कोणत्या घटना दारिद्र्याचे संकेत देतात, याविषयी जाणून घेऊया दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून. तुळस सुकणे - तुळशीचे रोप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते, तेथे धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी वास करते. तुळशीचे हिरवे रोप हे तुमच्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंदाचे लक्षण आहे. मात्र, तुळशीचे सुकलेले रोप हे सूचित करते की, तुम्हाला कुटुंबात काही मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. शास्त्रातही तुळस कोमेजणे अशुभ मानले गेले आहे. माता लक्ष्मी दारिद्र्य, विघ्न आणि संकट असलेल्या घरांमध्ये वास करत नाही, म्हणून तुळशीचे रोप सुकणे हे धनहानी आणि नकारात्मक शक्तींच्या प्रवेशाचे लक्षण आहे, म्हणून अशा घटनेकडे दुर्लक्ष करू नये. तुळस सुकणार नाही याची काळजी घ्यावी. उपासनेत व्यत्यय - ज्या घरात नियमित पूजा होते, तेथे देवतांचा आशीर्वाद राहतो आणि कुटुंबावर कोणत्याही संकटाची छाया नसते. पण जर एखाद्या कारणाने पूजेत सतत अडथळे येत असतील तर ते नकारात्मक शक्तींच्या प्रवेशाचे लक्षण मानले जाते. पूजेत अडथळे निर्माण होत असतील किंवा पूजेदरम्यान जाणूनबुजून किंवा नकळत तुम्ही वारंवार चुका करत असाल तर भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. वारंवार काच फुटणे- आरसा किंवा काच ही एक नाजूक वस्तू आहे. एखादी हलकी वस्तू काचेवर आदळली तरी तिला तडे जातात किंवा तुटते. अध्येमध्ये काच फुटणे एक सर्वसाधारण गोष्ट आहे. पण घरामध्ये काही ना काही कारणाने आरसे वारंवार तुटत असतील तर ते आर्थिक अडचणीचे निदर्शक असू शकते. तसेच काच पुन्हा पुन्हा फुटणे हे धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जात नाही, त्यामुळे तुटलेली काच ताबडतोब घराबाहेर फेकून द्यावी. हे वाचा - डायनिंग टेबल घरात कोणत्या दिशेला असावे? त्याचे हे वास्तु नियम ध्यानात ठेवा घरात संघर्षाची परिस्थिती - प्रत्येक कुटुंबात लहान-मोठे भांडण होतच असतात, पण जर ते रोजचेच झाले तर समजून घ्या की घरात नकारात्मक ऊर्जा वावरत आहे. घरातील सदस्यांमधील कलह आणि मतभेदांमुळे कुटुंबात नेहमीच वादविवाद होत असतात, हे घरची आर्थिक स्थिती ढासळण्याची चिन्हे आहेत. हे वाचा - एजंट काही सेकंदात ट्रेनचं तिकीट बुक करतात, मग सर्वसामन्यांना का नाही जमत? (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)