छत्रपती संभाजीनगर,18, जुलै : हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमागे खास कारण आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर काय करावं? याचं देखील एक शास्त्र आहे. मंदिरात गेल्यानंतर आपण हमखास नारळ फोडतो. हे नारळ फोडण्याचं कारण अनेकांना माहिती नसतं. छत्रपती संभाजीनगरमधील गुरुजी अनंत पांडव यांनी याबाबतची माहिती दिलीय. काय आहे अख्यायिका ? ‘भगवान विष्णू पृथ्वीवर महालक्ष्मी, कामधेनू आणि कल्पवृक्ष म्हणजेच नारळ तीन गोष्टींना घेऊन आले होते. नारळाच्या झाडावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. नारळावरचे तीन डोळे हे भगवान शंकर यांचं प्रतिक आहे, अशी श्रद्धा आहे. नारळाला श्रीफळ असंही म्हणतात,’ अशी माहिती पांडव यांनी दिली.
‘देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशूचा बळी देण्यात येत असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला. विश्वामित्रांच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजेच नारळ याचे बलिदान देण्याचा सल्ला त्यांनी दिला. ‘नारळाला डोके, शेंडी, नाक, डोळे आहेत. बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकाव झाला पाहिजे म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला कुंकू लावायला आणि त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकावा करण्यास सांगितले. त्यामुळे रक्ताचा लाल रंगही आला. या पद्धतीनं ऋषींनी मनुष्याला नर आणि पशूहत्येपासून वाचविलं. त्याचबरोबर नारळ हे बाराही महिने सहज मिळणारे फळ असून ते दीघकाळ टिकणारेही आहे, ’ या तथ्याकडं पांडव यांनी लक्ष वेधलं. मृत व्यक्ती स्वप्नात येते? काय असतो नेमका अर्थ महिला नारळ का फोडत नाहीत ? म्हणजे नारळ हे बीजरूपी आहे, त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जुळलेला आहे अशी मान्यता आहे. महिला बीजरूपातच बाळाला जन्म देतात. अगदी त्याचाच संबंध नारळाशी लावला गेला. त्यामुळे महिलांनी नारळ फोडू नये असं मानलं जातं, असं पांडव यांनी म्हंटले आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)