जालना, 20 जुलै : आपल्या देशात देवी, देवतांची अनेक प्राचिन मंदिरं आहेत. या मंदिरांना एक खास असा इतिहास असून त्याचे संदर्भ धार्मिक ग्रंथातही आढळतात. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्येही एक प्राचिन मंदिर आहे. मत्स्य आकाराच्या डोंगराच्या मुखात या देवीचा गाभारा आहे. हे मत्स्योदरी देवीचे मंदिर जालना जिल्ह्यातलं प्रमुख मंदिर असून नवसाला पावणारी देवी असा याचा लोकिक आहे. हा नवस फेडण्यासाठी मुलं झोळीत टाकण्याची खास परंपराही इथं पाहायला मिळते. जालना शहरापासून 30 किलो मीटर अंतरावर अंबडमध्ये हे मंदिर आहे. मत्स्य आकाराच्या डोंगरात मत्स्याच्या मुखात देवीचा गाभारा आहे. या देवीचा उल्लेख स्कंद पुराणात आढळतो. श्री मत्स्योदरी देवी संस्थान हे जागृत देवस्थान आहे. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी हे तीन पिठे आहेत.
नवसाला पावणारी देवी म्हणून मत्स्योदरी देवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दरवर्षी साडेतीन हजार नवसाचे मुलं झोळीत टाकली जातात. प्रत्येक पायरीवर नारळ फोडण्याची मंदिरात प्रथा आहे. नवरात्रात इथं मोठा उत्सव असतो. त्यासाठी राज्यभरातून 8 ते 10 लाख भाविक येतात. संस्थानाचे अध्यक्ष म्हणून तहसलीदारांच्या हस्ते घटस्थापना केली जाते. अष्टमीला होम हवन झाल्यानंतर यात्रेची सांगता होते, अशी माहिती मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी दिली. नंदीच्या कानात का सांगितलं जातं गाऱ्हाणं? महादेवाशी आहे जवळचा संबंध संस्थांकडून भाविकांना काही सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लिफ्टची सुविधा, गार्डन आणि एक बहुउद्देशीय हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे. अंबरीश राजाची इथे समाधी आहे. त्याचबरोबर देवीचे भक्त तानाजी देशमुख यांची देखील समाधी आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)