सच्चिदानंद, प्रतिनिधी पाटणा, 7 जून : हिंदू परंपरेशी निगडीत भव्य मंदिरं भारतातच नाही, तर संपूर्ण जगात पसरलेली आहेत. परदेशातील हिंदू मंदिरं तर अध्यात्मिक पर्यटनाची मोठी केंद्र बनली आहेत. सध्या करोडो भक्तांना अयोध्येत राममंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होईल आणि रामलल्लाचं दर्शन कधी घेता येईल, याची आतुरता आहे. अशातच बिहारमधून एक अतिशय सुंदर बातमी समोर आली आहे. येथे पूर्ण रामायणाचं पुन्हा दर्शन होणार आहे. तब्बल 120 एकर जमिनीवर जानकी नगर साकारून त्यात ‘विराट रामायण मंदिर’ उभारलं जाणार आहे. हे जगातलं सर्वात मोठं मंदिर असेल, शिवाय याची लांबी अयोध्येच्या राममंदिराहून 3 पटीने जास्त असेल. सनटेक इन्फ्रा या प्रसिद्ध कंपनीकडून हे भव्य मंदिर बांधलं जाणार आहे. बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील केसरिया-चकिया रस्त्यावर केथवलिया-बहुआरा येथे 3.67 लाख वर्गफुट क्षेत्रफळात हे मंदिर बांधण्यात येणार आहे. या मंदिराचा सर्वोच्च शिखर 270 फूट उंचीचा असेल, तर एक शिखर 198 फूट उंच, चार शिखर 180 फूट उंच, एक शिखर 135 फूट उंच आणि 5 शिखर 108 फूट उंच असतील. त्याचबरोबर हे मंदिर 1080 फूट लांब आणि 540 फूट रुंद असेल. या विराट मंदिरात देवी-देवतांचे 22 मंदिर असतील. मुख्य मंदिरात प्रवेश करताच लाडक्या बाप्पाचं दर्शन होईल. तर, मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. शिवलिंगासह सहस्रलिंगदेखील असेल. 250 टन वजनाचे ब्लॅक ग्रॅनाइड खडक वापरून शिवलिंग आणि सहस्रलिंगाची उभारणी करण्यात येईल. 33 फूट उंच आणि 33 फूट गोल अशा या भव्य शिवलिंगाचं वजन 210 टन इतकं असेल. हे जगातील सर्वात मोठं शिवलिंग असेल. महत्त्वाचं म्हणजे आठव्या शतकानंतर आजपर्यंत भारतात कधीही सहस्रलिंग निर्माण करण्यात आलेलं नाही.
विशेष म्हणजे जानकी नगरात विराट रामायण मंदिरासह अनेक आश्रम, गुरुकुल आणि धर्मशाळा असतील. सनटेक इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर एकूण 3102 खांबांवर भक्कमरित्या उभं राहील. मंदिराच्या बांधकामात 1050 टन स्टील आणि 15 हजार घनमीटर काँक्रीटचा वापर होईल. बांधकामाचं सर्व साहित्य महावीर मंदिराकडून देण्यात येणार आहे. Pune News : पुण्याच्या लेकीची NDA मध्ये दमदार एन्ट्री, संपूर्ण देशात आली तिसरी, Video येत्या 20 जूनपासून विराट रामायण मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल. दोन वर्षांनंतर 2025 सालच्या श्रावण महिन्यापर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाची स्थापना केली जाईल. त्याच वर्षअखेरीस मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल. तर, मंदिरावरील 12 शिखरांच्या कामासाठी आणखी 2 वर्षांचा कालावधी लागेल. हे मंदिर एकूण तीन मजली असेल.