नाशिक 2 ऑक्टोबर : नाशिक हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे. या शहरामध्ये विविध मंदिरे आहेत. यामध्येच आणखी एका मंदिराची भर पडली आहे. या मंदिराचे नाव बिएपिएस स्वामी नारायण मंदिर असून हे मंदिर सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. या मंदिरात सर्व देवदेवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच धर्मातील बांधव मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या वैभवात स्वामी नारायण मंदिरामुळे मोठी भर पडली आहे. स्वामी नारायण मंदिर 140 फूट लांब, 55 फूट रुंद आणि 78 फूट उंच मंदिर आहे. यात 80 हजार घनफूट गुलाबी आणि 15 हजार घनफूट लाल दगडांचा मंदिर बनवण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे. मंदिरावरील नक्षीकाम अतिशय बारकाईने केलेले आहे. सुबक आणि आकर्षक नक्षीकाम आहे. मंदिराची कमान,स्तंभ ही सुंदर आहेत. नाशिक हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन व्हावं याकरिता स्तंभांवर विविध कलशांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. हेही वाचा : स्वामी नारायण मंदिर होणार सामाजिक कार्याचे केंद्र VIDEO
पाच शिखरांचे मंदिर
आपण अनेक मंदिर बघितली असतील एक दोन किंवा तीन शिखरांची मंदिर असतात. मात्र, स्वामी नारायण मंदिराला एकूण पाच शिखर आहेत. तीन मुख्य शिखर आणि दोन प्रासाद पुत्र शिखर आहेत. बंद प्रदक्षिणा मार्ग विशेष म्हणजे नाशिक मधील या स्वामी नारायण मंदिरात प्रदक्षिणा मार्ग हा बंद आहे. ऊन ,वारा,पाऊस याचा कोणताही परिणाम प्रदक्षिणा मारणाऱ्या भक्तांवर होणार नाही. हे या मंदिराचे विशेष महत्त्व आहे. तसेच मंदिराच्या घुमटावर स्वामी नारायण महाराज यांनी केलेल्या विविध लीलांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. जे भाविक या स्वामी नारायण मंदिरात दर्शनासाठी येतील. त्यांना भारतीय संस्कृती,शिल्प आणि स्थापत्य कलेचे दर्शन होईल, अशी प्रतिक्रिया स्वामी नारायण संस्थानचे प्रवक्ते आदर्शजीवन स्वामी यांनी दिली आहे.
गुगल मॅपवरून साभार कुठे आहे स्वामी नारायण मंदिर? बीएपीएस श्री स्वामी नारायण मंदिर, पंचवटी, नाशिक तपोवन केवडीबन (पिन कोड : 422003)नाशिक शहरातील मुख्य बसस्थानकापासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.सरकारी बस ने किंवा खाजगी वाहनाने आपण तिथपर्यंत पोहचू शकता,