विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 16 एप्रिल : साडे तीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया या मुहूर्ताला विशेष महत्व आहे. हिंदू बांधवांचा पवित्र सण म्हणून अक्षय्य तृतीयाला ओळखलं जात. या दिवशी सोन्याची खरेदी, शुभकार्य आणि नव्या वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र, अक्षय्य तृतीयाचे नेमकं महत्व काय आहे? अक्षय्य तृतीया कधी आहे? पूजा कोणत्या मुहूर्तावर करावी तसेच या दिवशी सोनं कोणत्या मुहूर्तावर खरेदी करावे याबाबत सविस्तर माहिती नाशिकचे धर्मशास्त्र अभ्यासक महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी दिली आहे. अक्षय्य तृतीयाचे महत्व काय आहे ? हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयाचे खास महत्व आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी हा मुहूर्त पवित्र मानला जातो. 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया आहे. याच दिवशी भगवान परशुराम जयंती आणि भगवान बसवेश्वर जयंती आहे. अक्षय्य शब्दाचा अर्थ असा आहे की कधी ही नाश होत नाही. या दिवशी केलेले ज्ञान, दान, जप अक्षय्य फल प्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असं म्हणतात.
भविष्य पुराण, मत्स्य पुराण, पद्म पुराण, स्कंद पुराण यामध्ये विशेष उल्लेख आढळतो. या दिवशी केलेल्या कार्याचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते. या दिवशी देवांचे व पितरांचे विशेष पूजन केले जाते. वैशाख महिना हा भगवान विष्णूसाठी अत्यंत आवडता व प्रिय महिना आहे. विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत अंघोळ करणारा माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो.असे भविष्य पुराणातील मध्यम पर्वात सांगितले आहे. जे काही दान केले जाते ते अक्षय्य होते. विशेषतः मोदक दिल्याने आणि गूळ आणि कापूराच्या साहाय्याने जलदान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. अशा माणसांची ब्रम्ह लोकात गणना होते. याच दिवशी केलेला उपवास, जप, ध्यान अक्षय्य फलदायी होते. तसेच या दिवशी ऋतू फल आंब्याला महत्व दिलं जातं. मडके,पंखे, पादत्राणे, जवस, छत्री, गहू, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे विशेष फलदाई असते आणि हे दान सतपात्री असावे अशी माहिती महंत अनिकेतशास्त्री यांनी दिली आहे.
जेजुरीच्या खंडोबाची अद्भुत आख्यायिका जाणून घ्या
अक्षय्य तृतीयाची पूजा या मुहूर्तावर करा अक्षय्य तृतीया दिनांक 22 एप्रिल 2023 रोजीचा मुहूर्त सकाळी 7 वाजून 49 मिनिट ते दुपारी 12 वाजून 20 मिनिटापर्यंत आहे. पूजेचा कालावधी हा 4 तास 31 मिनिट आहे. या मुहूर्तावर सोन खरेदी करा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी 7 वाजून 49 मिनिट ते 23 एप्रिल सकाळी 5 वाजून 48 मिनिटापर्यंत असेल, सोन खरेदी करण्याचा एकूण कालावधी 21 तास 59 मिनिट आहे. या शुभ मुहूर्तावर सर्वांनी सोनं खरेदी करावं, अशी माहिती महंत अनिकेतशास्त्री यांनी दिली.