baptismपुणे, 26 डिसेंबर : ख्रिश्चन धर्मीयांचा सर्वात पवित्र सण असलेला ख्रिसमस नुकताच मोठ्या उत्साहात जगभर साजरा झाला. ख्रिसमसचे कार्यक्रम हे फक्त 25 डिसेंबरपुरते मर्यादीत नसतात तर 31 डिसेंबरपर्यंत चालतात. आठवडाभर वेगवेगळ्या धार्मिक प्रथांचे पालन यावेळी ख्रिश्चन समाजाकडून केले जाते. चर्चमध्ये या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आणि प्रार्थनासभा होतात. ख्रिस्ती धर्मियांसाठी पवित्र असलेल्या या आठवड्याच्या निमित्तानं आपण बाप्तिस्मा या धार्मिक विधीबद्दल माहिती घेणार आहोत. कसा होतो बाप्तिस्मा? बाप्तिस्मा म्हणजे नामकरण विधी. बाप्तिस्मा चर्चमध्ये होतो. पुण्यातील सेंट मेरी चर्चचे प्रमुख फादर डॉ. प्रमोद काळसेकर यांनी याबाबतची विशेष माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बाप्तिस्मामध्ये त्या व्यक्तीला पूर्णपणे पाण्यात बुडवले जाते. आणि त्यातून बाहेर काढले जाते. याचा अर्थ असा की मानव जातीचे मूळ असलेल्या आदम याने जे काय पाप केले आहे ते पाप धुऊन निघावे. आम्ही शुद्ध व्हावे या उद्देशाने बाप्तिस्मा हा केला जातो. आपल्याला पाण्यात बुडवून पुन्हा बाहेर काढले जाते म्हणजेच आपला पुन्हा नवीन जन्म होतो. आणि यापुढे मी माझा पापी स्वभाव सोडून येशूने सांगितलेल्या मार्गावरती चालेल येशूचे शिष्य होईल असा याचा अर्थ आहे.’ फक्त 25 तारखेलाच नाही तर आठवडाभर करतात ख्रिसमस सेलिब्रेशन! बाप्तिस्मा कसा केला जातो? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तीन देवाच्या आशीर्वादाने बाप्तिस्माचे पाणी पवित्र केले जाते. हे पाणी ज्यावर शिंपडले जाईल, ती जागा तो मनुष्य पवित्र होतो असा ख्रिस्ती समाजात विश्वास आहे. बाप्तिस्मा करण्याचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्प्रिंकलिंग म्हणजे पाणी शिंपडणे. दुसरा प्रकार पोरींग करणे म्हणजेच पवित्र पाणी ओतून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मायांच्या आशीर्वादाने पाणी ओतून बाप्तिस्मा केला जातो. तिसरा प्रकार म्हणजे मोठ्या माणसांना पाण्यात बुडून बाहेर काढणे याला इमर्शन असे म्हणतात. चर्चमध्ये पाण्याचे कुंड असतात तिथं या पद्धतीनं बाप्तिस्मा करण्यात येतो.