पुणे, 25 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता लॉकडाऊनच्या नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. ग्रामीण भागात शॉपिंग मॉल्स सोडून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी आहे. शहरी भागात किराण्याची दुकानं, शेजारची दुकाने आणि निवासी संकुलांमधील दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने निवासी संकुलातील दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली असली तरी पुणे शहर हे कोरोनाच्या रेड झोनमध्ये येत असल्याने पुण्यातील किरकोळ व्यापाऱ्यांना आपली दुकाने उघडता येणार नाहीत. किंबहुना स्थानिक प्रशासनाच्या आदेशाचेच दुकानदारांनी तंतोतंत पालन करावं, अशा सूचना पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिल्या आहेत. हेही वाचा - पुण्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये घडला विचित्र प्रकार, पोलिसांचीच उडाली तारांबळ पुणे जिल्ह्यात काय आहे कोरोनाची स्थिती? पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 1 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कारण पुणे जिल्ह्यात एकूण 1094 कोरोनाबाधित व्यक्ती असून मृतांचा आकडा 67वर पोहोचला आहे. तर फक्त पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 980वर गेली आहे. यातील 146 जण बरे होऊन घरी परतले आहेत. पुणे शहरातील अॅक्टिव्ह पेशंट्सची संख्या 770 इतकी आहे. संपादन - अक्षय शितोळे