पुण्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये घडला विचित्र प्रकार, पोलिसांचीच उडाली तारांबळ

पुण्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये घडला विचित्र प्रकार, पोलिसांचीच उडाली तारांबळ

पुण्यात ही स्थिती निर्माण झालेली असतानाच एक विचित्र प्रकार समोर आला.

  • Share this:

पुणे, 25 एप्रिल : पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 1 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कारण पुणे जिल्ह्यात एकूण 1094 कोरोनाबाधित व्यक्ती असून मृतांचा आकडा 67वर पोहोचला आहे. तर फक्त पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 980वर गेली आहे. यातील 146 जण बरे होऊन घरी परतले आहेत. पुणे शहरातील अ‍ॅक्टिव्ह पेशंट्सची संख्या 770 इतकी आहे.

एकीकडे, पुण्यात ही स्थिती निर्माण झालेली असतानाच एक विचित्र प्रकार समोर आला. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीनंतर एका दानशूर व्यक्तीने पुण्यातील येरवडा भागात किराणा मालाचे पॅकेट्स वाटण्याचा निर्णय घेतला. हा व्यक्ती किराणा मालाचे 40 पॅकेट्स घेऊन येरवडा पोलीस स्थानकात दाखल झाला. या व्यक्तीच्या विनंतीनंतर पोलिसांनी शेजारच्या वस्तीतील काही नागरिकांना किराणा घेण्यासाठी निरोप दिला.

पोलिसांकडून निरोप आल्यानंतर पोलीस स्थानकाकडूनच सर्वांना किराणा मालाचे वाटप होत आहे, असा समज झाला आणि तब्बल 300 हून अधिक महिला पोलीस स्थानकात दाखल झाल्या. किराणा मालाचे अवघे 40 पॅकेट्स असताना 300 महिला आल्याने पोलीस स्थानक परिसरात काहीशी गर्दी झाली. त्यामुळे येरवडा सारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची भीती होती.

हेही वाचा - सर्वांना चकवा देत सांगलीत प्रवेश करणाऱ्या मुलीला कोरोनाची लागण, 5 जणांविरोधा गुन्हा दाखल

गर्दीची परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी त्या महिलांना तिथून परत लावण्यासाठी प्रयत्न केला. मात्र आम्हाला राशन द्या, अशी मागणी या महिलांनी लावून धरली. अखेर पोलिसांनी परिसरातील एका ज्येष्ठ नगरसेवकाला बोलावून संबंधित महिलांची समज काढली. मात्र या सगळ्या गडबडीत पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. याबाबत 'सकाळ'ने वृत्त दिलं आहे.

पुण्यातील दुकाने राहणार बंदच, हे आहे कारण

लॉकडाऊनच्या नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. ग्रामीण भागात शॉपिंग मॉल्स सोडून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी आहे. शहरी भागात किराण्याची दुकानं, शेजारची दुकाने आणि निवासी संकुलांमधील दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने निवासी संकुलातील दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली असली तरी पुणे शहर हे कोरोनाच्या रेड झोनमध्ये येत असल्याने पुण्यातील किरकोळ व्यापाऱ्यांना आपली दुकाने उघडता येणार नाहीत. किंबहुना स्थानिक प्रशासनाच्या आदेशाचेच दुकानदारांनी तंतोतंत पालन करावं, अशा सूचना पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिल्या आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 25, 2020, 12:03 PM IST

ताज्या बातम्या