प्रातिनिधीक फोटो
पुणे, 13 ऑक्टोबर : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ आजही कायम आहे. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लॉगइन आयडी व पासवर्ड विद्यापीठाने नेमलेल्या एजन्सीकडून परस्पर कुणालाही पाठवले जात आहेत. विद्यापीठाच्या अश्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी केली जात आहे,’ असा आरोप युवासेनेकडून करण्यात आला आहे. तसंच या गोंधळाबाबत युवासेनेनं थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंकडेही तक्रार केली आहे. पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येत असलेल्या परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचं वारंवार समोर येत आहे. मात्र त्याचवेळी एका विद्यार्थ्याचा परीक्षेसाठीचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड दुसऱ्याच विद्यार्थ्याला पाठवला गेल्याचंही समोर आलं आहे. याबाबत युवासेनेचे पदाधिकारी सचिन बांगर यांनी आरोप केला आहे. तसंच सचिन बांगर आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्यातील एक फोन कॉलही व्हायरल झाला आहे. यामध्ये युवासेनेचे सचिन बांगर हे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत कुलगुरुंना माहिती देत असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ आजही कायम. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे Login Id व Password विद्यापीठाने कुणालाही पाठवले आहेत. विद्यापीठाच्या अश्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी होईल. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने युवासेना विस्तारक सचिन बांगर यांनी कुलगुरूंना फोन करून याबाबत पुराव्यासह जाब विचारला. दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा युवासेना लढा उभारणार,’ असा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, 13 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारच्या सत्रातील ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे सदर परीक्षा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या. या सर्व परिस्थितीमुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.