पुणे, 3 जानेवारी : थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची आज (3 जानेवारी) जयंती. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी 19 व्या शतकात सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. पुण्यातील भिडे वाड्यात त्यांनी ही शाळा सुरू केली. फुले दाम्पत्यानं दाखवलेल्या या असमान्य धैर्यामुळे देशात मुलींच्या शिक्षणाची दार उघडली गेली. सावित्रीबाईंनी ज्या भिडे वाड्यात ही शाळा सुरू केली तो वाडा सध्या पडक्या स्थितीत आहे. देशाच्या या ऐतिहासिक ठेव्याकडं होत असलेलं दुर्लक्ष पाहून कुणालाही संताप येईल. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्तानं News18 लोकमतच्या प्रतिनिधीनं या वाड्याला भेट दिली तेव्हा हे धक्कादाय वास्तव दिसलं. सावित्रीबाईंच्या कार्याचा महान वारसा सांगणाऱ्या या वाड्याकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष झालंय. हा वाडा ठिकठिकाणी पडला असून याच्या भिंती देखील खचल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाचं पवित्र कार्य ज्या वाड्यात सुरू झालं तिथं सध्या सर्वत्र धूळ, जाळी जळमटं आणि अस्वच्छतेचं साम्राज्य आहे. हा वाडा अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारा भिडे वाडा हाच आहे का? असा प्रश्न हे सर्व पाहून कुणाच्याही मनात येईल. वडिलांच्या ‘त्या’ वाक्यामुळे दुखावलेल्या सावित्रीबाई; घेतलेली उच्च शिक्षण घेण्याची शपथ भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. ती मागणी मान्य करुन याबाबतचे ठराव पुणे महापालिकेत झाले. पण, या प्रकरणात कोर्टात केस प्रलंबित असल्यानं इथं अद्याप स्मारक उभारण्यात आलेलं नाही. पाठपुरावा करणार भिडे वाडा आणि जवळच्या बाहुबली हौदाची सध्या दुरवस्था आहे. महिलांच्या शिक्षणाच्या या स्मारकाबाबत पुण्याचे पालकमंत्री, शिक्षण मंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलंय. या प्रकरणात अवास्तव मागण्यांमुळे सरकारला निर्णय घेणे अवघड होत असल्यानं नागरिकांनीही त्यावर विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.