नवी दिल्ली 03 जानेवारी : भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज, (3 जानेवारी) जयंती. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने सावित्रीबाईंनी पुढे नेला. त्यांचा हा प्रवास खूपच संघर्षमय होता. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. स्त्री हक्क, सती, अस्पृश्यता, विधवाविवाह यांसारख्या अमानुष रूढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध जोरदार आवाज उठवणाऱ्या सावित्रीबाईंना समाजातील रूढीवादी विचारांच्या बेड्या तोडण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला.
7 वैज्ञानिकांना नोबेल देणाऱ्या भारतीय संशोधक राहिला पुरस्काराविनाच
सावित्रीबाई 9 वर्षांच्या असताना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह ( married) 13 वर्षं वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या अशिक्षित ( uneducated) होत्या, तर ज्योतिबा यांनी फक्त तिसरीपर्यंतच शिक्षण घेतलं होतं. सावित्रीबाईंनी शिक्षणाचं ( education) स्वप्न पाहिलं होतं. ते त्यांनी लग्नानंतर पूर्ण केलं. त्यांचा संघर्ष किती कठीण होता, हे त्यांच्या जीवनातल्या एका घटनेवरुन समजू शकेल. एके दिवशी सावित्रीबाई खोलीत एका इंग्रजी पुस्तकाची पाने उलटत होत्या. हे त्यांच्या वडिलांनी पाहिले व हातातले पुस्तक हिसकावून घराबाहेर फेकले. ‘केवळ उच्चवर्णीय पुरुषांनाच शिक्षणाचा अधिकार आहे. महिलांनी शिक्षण घेणं हे पाप आहे,’ असंही ते सावित्रीबाईंना म्हणाले. हा तो क्षण होता, जेव्हा सावित्रीबाईंनी शपथ घेतली, की ‘एक ना एक दिवस त्या नक्की शिक्षण घेतील.’ पुढे त्या फक्त शिकल्या नाहीत, तर अनेक मुलींना शिक्षण देऊन त्यांचं भविष्य घडवलं; पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. सर्वांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केलं. शिक्षणासाठी लढा देण्याबरोबरच सावित्रीबाईंनी अमानुष रूढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध आवाज उठवला. अस्पृश्यता, सती, बालविवाह, विधवाविवाह अशा अमानुष रूढी-परंपरांविरोधात त्या लढा देत होत्या. एके दिवशी काशीबाई नावाची एक विधवा स्त्री आत्महत्या करणार होती, ती गर्भवती होती. त्यामुळे समाज काय म्हणेल, या भीतीने तिला आत्महत्या करायची होती; पण सावित्रीबाईंनी तिला घरी आणले व तिची समजूत काढली. काशीबाई यांना झालेल्या मुलाला सावित्रीबाईंनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंतराव ठेवले. या यशवंतरावांना पुढे त्यांनी डॉक्टर केले.
ताणतणाव तुम्हाला लवकर म्हातारं बनवतंय; संशोधकांनी सांगितला याला रोखण्याचा मार्ग
सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी तब्बल 18 शाळा काढल्या. 1848 साली पुणे येथे देशातली मुलींची पहिली शाळा स्थापन करून त्यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या वेळी काही धर्ममार्तंडांनी ‘धर्म बुडाला’ अशी ओरड करून सावित्रीबाईंवर शाळेत जाताना शेणमाती, दगड फेकले. तरीसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत व त्यांनी मुलींना सुशिक्षित करण्याचे व्रत सुरूच ठेवून इतिहास रचला. आजही लाखो मुलींसाठी त्या प्रेरणा आहेत. भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी केलेलं कार्य इतिहास बनलं. त्या स्वतःच्या कार्यातूनच खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाल्या आहेत. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाची आज जयंती असून, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!