पुणे, 12 एप्रिल : पुण्यात कोरोनाचा (Pune Coronavirus) उद्रेक होत असताना अगदी केंद्रीय पातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र दिव्याखाली अंधार असल्याचे प्रकार पुणे महापालिकेत (PMC) घडताना पाहायला मिळत आहेत. या जागतिक महामारीतही पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांना खाबुगिरी शिवाय काही सुचत नसल्याचं चित्र आहे. पुण्यात कोरोनाने हाहाकार माजलेला असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्रांना लस देण्यासाठी प्रत्येक लसीमागे 10 रुपये लाच देण्याची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप आरोग्य विभागातील अधिकारी डॉक्टर अमित शहा यांच्यावर करण्यात आला आहे. ही लाच देण्यास नकार दिल्यानंतर कोटबागी हॉस्पिटल औंध या खासगी लसीकरण केंद्राला लसीकरण केंद्र बंद करावं लागलं आहे. हे केवळ एकमेव लसीकरण केंद्र असं नाही जे लाच न दिल्यामुळे बंद करण्यात आलं आहे, तर सिंहगड रोडच्या देवयानी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या खासगी लसीकरण केंद्राला लस देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतरही हे लसीकरण केंद्र बंद करावं लागलं आहे. एकीकडे, कोरोनाचे आकडे भीतीदायक पद्धतीने वाढत असताना सरकारी यंत्रणा ही अत्यंत अपुरी पडत आहे. अशावेळी पुण्यातल्या खासगी हॉस्पिटलने पुढे येत अनेक लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. मात्र या खासगी लसीकरण केंद्रांना लसीच वाटप करताना वाटप करण्याची जबाबदारी असलेले आरोग्य अधिकारी लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी लसीकरण केंद्रांनी केल्या आहेत. हेही वाचा - कोरोना लसीचे 2 डोस घेऊनही रुग्णांचा मृत्यू, न्यायालयानं चिंता व्यक्त करत गुजरात सरकारला फटकारलं यासंदर्भात पुणे महापालिकेचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आरोग्य प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्तांकडे या गंभीर प्रकाराची तक्रार केली आहे, मात्र या अधिकाऱ्यांकडून खासगीत माजी महापौरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे या लाच मागण्याच्या प्रकरणात शहा यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक तक्रारी आल्यानंतरही या प्रकरणाची चौकशी का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अतिरिक्त आयुक्तांचं स्पष्टीकरण या सगळ्या संतापजनक प्रकारानंतर पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी खुलासा केला आहे. ‘शहा यांच्याकडे याबाबत प्राथमिक चौकशी केली असून त्यांनी आरोप फेटाळले आहेत. मात्र तूर्तास त्यांच्याकडील लस वाटपाची जबाबदारी मी स्वतःकडे घेतली असून शहा यांनी केवळ दिलेल्या आकड्यांनुसार खासगी लसीकरण केंद्रांना द्यायचे आदेश देण्यात आलेले आहे. दोन दिवसाच्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून खासगी लसीकरण केंद्राला लस द्यायचा फॉर्म्युला तयार केला आहे,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.