पुणे 09 ऑक्टोंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ विधानसभा प्रचारासाठी आजपासून धडाडणार आहे. पुण्यात पहिली सभा घेऊन ते हल्लाबोल करणार आहेत. राज ठाकरे यांचं भाषण हे कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असतं. त्यांच्या स्टाईलवर फिदा होणाऱ्या तरुणांचा एक मोठा वर्ग मनसेकडे आहे. राज यांची ही क्रेझ कमी झालेली नाही. राज ठाकरेही आपल्या कार्यकर्त्यांची कायम काळजी घेत असतात. पुण्यात आल्यावर अशाच एका कार्यकर्त्याची विनंती राज ठाकरेंनी मानली आणि त्या कार्यकर्त्याने घेतलेली नवी कोरी कार राज यांनी चालवून बघितली. खुद्द राज ठाकरेंनी आपण घेतलेली कार चालवल्यामुळे आपल्याला झालेला आनंद व्यक्त करू शकत नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सचिन ननावरे यांनी व्यक्त केलीय.
सचिन हे पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये मनसेचं काम करतात. त्यांना राज ठाकरेंचं असलेलं गाड्यांवरचं प्रेम माहित आहे. नवरात्रीचा मुहूर्त साधत सचिन यांनी नवी कार घेतली होती. कुठल्याही मध्यवर्गीयाचं कार घेणं हे स्वप्न असतं. त्यामुळे सचिन आणि त्याचं कुटुंबीय आनंदात होतं. त्यातच राज ठाकरे हे पुण्यात प्रचारासाठी येणार असल्याचं त्यांना माहित होतं.
आपली नवी कोरी कार राज ठाकरेंनी चालवावी अशी त्याची इच्छा होती. त्याने ची इच्छा राज ठाकरेंना बोलून दाखवली. राज यांनीही आपल्या कार्यकर्त्याचा मान राखत त्याला दुसऱ्या दिवशी कार आपल्या निवासस्थानी घेऊन यायला सांगितली. राज ठाकरेंनी होकार देताच सचिन यांनी सर्व जय्यत तयारी करत कार राज ठाकरेंच्या घरी आणली. राज यांनीही आस्थेने सर्व चौकशी करत स्वत:ती कार चालवली आणि सचिनला काही टिप्सही दिल्या. कार चालवताना काळजी घे, नियमांचं पालन कर असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाही.