JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 'वर्ष बाकी आहे, दादांनी विचार करावा', फडणवीसांची मागणी अजित पवार मान्य करणार?

'वर्ष बाकी आहे, दादांनी विचार करावा', फडणवीसांची मागणी अजित पवार मान्य करणार?

कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना आवाहन केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 जानेवारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुलाच्या लग्नासाठी फडणवीस दिल्लीमध्ये आहेत, यावेळी त्यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचं आवाहन विरोधकांना केलं आहे. ‘मी स्वत: काही नेत्यांशी बोललो आहे. बावनकुळे यांनाही विनंती केली आहे. निवडणूक न झालेली बरी, वर्ष बाकी आहे. अजितदादांनी विचार करावा,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ‘दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निवडणुका बिनविरोध होतील, अशी आमची आशा आहे. पण निवडणुका झाल्या तर भाजप लढवणारच आहे. मुख्यमंत्र्यांनीही बिनविरोध संदर्भात नेत्यांना विनंती केली आहे. विरोधी पक्ष विनंतीला प्रतिसाद देतील,’ अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे महाविकासआघाडी मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. ‘निवडणुका बिनविरोध होण्याचं काही कारण नाही. त्यांनी कोल्हापूर, पंढरपूर देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. मुंबईच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला, म्हणजे बाकीच्या सगळ्या निवडणुका बिनविरोध होतील, हे त्यांनी डोक्यातून काढावं,’ असं अजित पवार म्हणाले आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या महाविकासआघाडीकडून अर्ज भरण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ‘एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. मी म्हणलं चर्चा करू. काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, टिळकांना डावललं गेलं. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला अर्थ नाही. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील,’ असं नाना पटोले यांनी सांगितलं. ‘घरातला उमेदवार दिला गेला नाहीये. राज ठाकरेंनी पत्र लिहिलं आहे, पण कोणाची वकिली चालण्याचं कारण नाही. एकनाथ शिंदे बोलतात त्याच्या विरोधात फडणवीस वागतात,’ असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे. कसब्याची जागा काँग्रेस लढवणार आहे, आम्ही भूमिका मांडू. चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवेल, तिथे काय निर्णय होणार ते राष्ट्रवादीला विचारा, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला. याशिवाय राज ठाकरे यांनीही पोटनिवडणुकांमध्ये महाविकासआघाडीने उमेदवार देऊ नये, असं पत्र लिहिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या