पिंपरी चिंचवड, 22 मार्च: आज सायंकाळी अचानक सुसाट वेगाने सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरात नागरिकांची चांगलीचं धांदल उडाली आहे. पिंपरी चिंचवडनजीक असलेल्या आय टी पार्क हिंजवडी परिसरात एक भला मोठा बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत होर्डिंगच्या कचाट्यात सापडलेल्या काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण शहरात जोखीम पत्करून लावल्या जाणाऱ्या होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी हिंजवडी आय टी पार्क परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यानंतर अचानक वादळीवाऱ्याला सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील काही झाडंही उन्मळून पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडींही झाली. याशिवाय हिंजवडी परिसरातील अत्यंत वर्दळीचं ठिकाण असणाऱ्या विप्रो सर्कल रस्त्याच्या बाजूला असलेलं एक मोठं होर्डिंग रस्त्यावर कोसळलं आहे. यावेळी रस्त्यावर थोडी विरळ गर्दी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. पण या होर्डिंगच्या कचाट्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनं दोन वर्षांपूर्वी पुण्यातील जुना मार्केट परिसरात पडलेल्या होर्डिंगची पुन्हा आठवण झाली आहे. त्यावेळी होर्डिंग कोसळून चार जणांचा जीव गेला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. आज या घटनेची पुनरावृत्ती हिंजवडी परिसरात झाली आहे. मात्र सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे ही वाचा - हडपसरमधील कालव्यात सापडलेल्या मृतदेहामागचं गुढ उलगडलं; दोघांना केलं गजाआड खरंतर अशा प्रकारचे अनेक होर्डिंग्स या परिसरात आहेत. हे होर्डिंग्स लोखंडी असल्यानं ते कुजलेली देखील आहेत. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशा अवैध होर्डिंग्सवर कारवाई करणं आवश्यक आहे.