पुणे, 17 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेतल्यामुळे राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ‘शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट असल्याने आजच्या मोदी - पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही’ असं म्हणत काँग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना सुशील कुमार शिंदे यांनी शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट आणि राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. शरद पवार हे महाविकास आघाडीतचे ज्येष्ठ नेते आहे. मुळात पवारसाहेब हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळे आजच्या मोदी-पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भाषा योग्यच आहे, प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हालाही आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचा आहे. त्यामुळे जवळ आहे तोवर जवळ, नाही तेव्हा बघू पुढं काय करायचं ते, असं सूचक विधानही शिंदे यांनी केलं. तसंच, अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. केंद्राकडून ईडी, सीबीआय सारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होतोय हे दुर्दैवं आहे, असंही शिंदे म्हणाले. केंद्रात नव सहकार खातं निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळीला कोणताही धोका पोहोचणार नाही, ही चळवळ भक्कम पायावर उभा आहे, असंही शिंदे म्हणाले. मोदी-पवार भेटीबाबत शिवसेना आणि काँग्रेसला होती कल्पना - मलिक शरद पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पण ही भेट पूर्वनियोजित होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांना पूर्वकल्पना होती, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
‘मागच्या वेळी भाजपने विचारलं होतं, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा स्पष्ट नाही म्हणून सांगितले होतं, आम्ही तेव्हाही भाजप सोबत गेलो नाही. त्यानंतर आम्ही महाआघाडी स्थापन केली. आज दिल्लीत मोदी यांच्यासोबत होणार असलेल्या बैठकीबाबत एच.के.पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती, असंही मलिक म्हणाले.