पुणे, 18 जानेवारी : शाळेची फी न भरल्यामुळे जळगावमध्ये विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर समोर आला होता. जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत हा गंभीर प्रकार घडला होता. जळगावमधील ही घटना ताजी असतानाच आता विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात काय घडलं - शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर 30 ते 40 विद्यार्थ्यांना पाच तास डांबून ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. वाघोलीमध्ये नामांकित असलेल्या लेक्सिकाँन शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. तसेच पालक जोपर्यंत येथे येत नाहीत आणि जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना सोडणार नाही, अशी धमकीही विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवर देण्यात आली असा आरोप पालकांनी केली आहे. याबाबत पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये शाळेवर तक्रारी अर्ज दाखल केला आहे. तसेच शाळेवरती अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी पालकांनी केली आहे. शाळेच्या प्राचार्य यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दूरध्वनी वरून संपर्क करण्यास असमर्थ दाखवली. हेही वाचा - फोटो व्हायरल करण्याची धमकी, लॉजवर नेऊन अल्पयवीन मुलीवर अत्याचार; तरुणाला सुनावली कोठडी काही दिवसांपूर्वी जळगावातही घडला धक्कादायक प्रकार - शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये समोर आला आहे. याबाबत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता जोपर्यंत फी भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिल्या जाणार नसल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे, असा आरोप पालकांनी मागच्या आठवड्यात केला होता.