नाशिक, 12 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. लॉकडाउन लागू असल्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाणही कमी झालं आहे. परंतु, नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी 5 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. हे सर्व पोलीस कर्मचारी देवळाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दोन दिवासांपूर्वी देवळाली कॅम्प भागातील हाडोळा येथे राहणाऱ्या यश पवार याच्यावर सनी कदम याने गोळीबार केला होता. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच प्रमाणे त्याचा भाऊ शामलीन पवार याच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले होते. शहरातून हद्दपार केलेल्या गुंडांकडून गोळीबार केला गेल्याने खळबळ उडाली होती. हेही वाचा - PM आज 8 वाजता करणार जनतेला संबोधित, लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता या घटनेची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत संबंधित दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी देवळाली पोलीस ठाण्यात भेट देऊन संशयित सनी कदम बाबत माहिती असलेले पोलीस कर्मचारी यांची माहिती घेतली. यात दोन पोलीस हवालदार आणि तीन पोलीस शिपाई यांनी कर्तव्य करण्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर रात्री उशीरा कारवाई करण्यात आल्याचे कळते. हेही वाचा - आज धावणार या 8 स्पेशल ट्रेन, वाचा काय आहेत वेळा आणि कोणत्या स्टेशनवर थांबणार याबाबत पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. संपादन - सचिन साळवे