मुंबई, 7 मे: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीने संपूर्ण देश हादरला आहे. देशात लॉकडाऊन आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. हे कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. एसटीचा एक कर्मचारी दररोज बाईकने 170 किलोमीटरचा प्रवास करून अत्यावश्यक सेवा देत आहे. ज्ञानेश्वर वाघुले (56) असं या धाडसी कर्मचाऱ्याचं नाव असून ते वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा देत आहेत. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून दररोज 5 तासांचा प्रवास (एकाबाजुने) करून ज्ञानेश्वर वाघोले मुंबईच्या कुर्ला नेहरू नगर डेपोमध्ये अत्यावश्यक सेवा देत आहेत. निवृत्तीला आलेल्या या एसटी कर्मचाऱ्याचा विक्रम तर तरुणाईलाही लाजवणारा आहे, असंच म्हणता येईल.
हेही वाचा.. कोरोना योद्धांना सॅल्युट! एक वर्षाच्या चिमुरड्याला खेचून आणलं मृत्यूच्या दारातून ज्ञानेश्वर वाघुले हे कुर्ला नेहरूनगर डेपोत वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत आहेत. हे काम करण्यासाठी त्यांना तब्बल पाच तासाचा प्रवास करून कामावर यावे लागत आहे. ज्ञानेश्वर वाघुले हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रविवार पेठ या परिसरात राहतात. आठ तासांचं काम करण्यासाठी त्यांना रोज पाच तास यायला आणि पाच तास घरी जायला असा तब्बल दहा तासांचा प्रवास करावा लागत आहे. मुख्य म्हणजे वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हा प्रवास त्यांच्या दुचाकीवर करावा लागत आहे. परंतु यात कुठलाही कंटाळा न करता ते रोज कामावर हजर होत आहेत. ज्ञानेश्वर वाघुले यांच्याप्रमाणे त्यांचा एक मुलगा देखील बेस्टमध्ये आपली सेवा देत आहे. वाघुले यांचा मुलगा वाहक असून तोही अत्यावश्यक सेवा देत आहे. हेही वाचा.. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ठाणे महापालिकेने तयार केला ACTION PLAN खरंतर वाघुले यांना निवृत्तीसाठी अवधी काही वर्षे शिल्लक आहेत. त्यांचं वय 56 वर्ष असल्यामुळे त्यांना या सेवेतून काढता पाय घेता आला असता. तसे न करता ज्ञानेश्वर वाघुले मात्र पाच तास सलग प्रवास करत मुंबई गाठतात. परतीच्या वेळी मुंबईतून निघून घर गाठतात. वाघुले यांच्या घरी त्यांचे वयोवृद्ध आई-वडील दोघेही असल्यामुळे त्यांना घर गाठावंच लागतं. वाघुले यांची कामावर असलेली नितांत श्रद्धा त्यांना हा प्रवास सुखकर करण्यास मदत करते. मुख्य म्हणजे कुठलीही चिडचिड किंवा त्रागा न करता वाघुले ही सेवा देत असल्यामुळे त्यांचे करावे तेवढं कौतुक कमी आहे.