मुंबई, 23 सप्टेंबर : रात्रीभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. मुंबईत दादर-कुर्ला आणि कुर्ला ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकलच्या 4 सेवा विस्कळीत झाल्या आहेत. झव्हेरी बाजार परिसरात इलेक्ट्रिक लाईट बंद पडल्या आहेत तर अनेक ठिकाणी दुकांनांमध्ये पाणी शिरलं आहे.
हे वाचा- LIVE : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण, मध्य रेल्वेची सेवा ठप्प नवी मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुंबई शहरात 186 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर पूर्व उपनगरात 154 मिमी, पश्चिम उपनगरांत 208 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे वरळी परिसरातील बीएमसी कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं त्यांची तारांबळ उडाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सीबीडी बेलापूर येथे सर्वत्र पाणी शिरलं आहे. अनेक दुकान आणि सोसायटी मध्ये पाणी घुसले तळ मजल्यावर असलेल्या अनेक घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले आहेत.