पिंपरी, 29 जून : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पाहता पंढरपूरच्या वारीला मनाई करण्यात आली आहे. परंतु, आता वारकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वाखरी ते पंढरपूर पायी वारी करू द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पुण्यातील वारकरी सेवा संघाकडून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. जगन्नाथ पुरी रथ यात्रेला जर परवानगी मिळत असेल तर काही अटी शर्थींसह वारीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पोलिसांची सुमो व्हॅन पलटली, पाहा हा VIDEO या याचिकेत वाखरी ते पंढरपूर दरम्यानच अंतर 100 वारकऱ्यांच्या उपस्थितीत चालत जाऊन पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नगर प्रर्दक्षिणा, स्नान, गोपाळकाला, वारीतील या परंपरा पूर्ण करण्यासाठी पोर्णिमेपर्यंत मुक्कामी राहण्याची परवानगीही देण्यात यावी, असंही याचिकेत म्हटलं आहे. आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय २9 मे रोजी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. मात्र, पादुका हेलिकॉप्टर की बसने जाणार असा संभ्रम होता. पण आता हा संभ्रम दूर झाला आहे. माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान हेलिकॉप्टरमधून नाही तर शिवनेरी बसमधून होणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिली. 20 मानकऱ्या समवेत 30 जूनला सकाळी 10 वाजता माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. विशेष म्हणजे माऊलींची पालखी शिवनेरी बसनं नियमित रस्त्याने पंढरपूरकडे रवाना होणार आहे. माऊलींचा पालखी सोहळा किमान वाखरीपासून तरी पालखी पायी चालत नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी विश्वस्तांनी शासनाकडे केली होती. वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार - मुख्यमंत्री ‘आपली आषाढी वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे आणि मी पंढरपुरला चाललो आहे. विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा, वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘आपल्या विठू रायाला साकडं घालणार आहे, राज्यात काय परिस्थिती निर्माण झाले आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहे. अनेक चित्रपटातून तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहे. राज्यावरील कोरोना संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीशी उभे राहावे. मुख्यमंत्री म्हणून मान वेगळा आहे पण मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर तुमचा प्रतिनिधी म्हणून जात आहे.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केलं. संपादन - सचिन साळवे