साक्षी मलिकची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली, 5 जून : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पैलवानांच्या आंदोलनात ट्विस्ट आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची भेट घेतल्यावर आंदोलनातील प्रमुख पैलवान साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या तिघांनी रेल्वेच्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत कुस्तीपटूंच्या बैठकीत ‘सामान्य संभाषण’ झाले. यावेळी त्यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना अटक करावी, अशी मागणी केली. यावेळी आंदोलनातून माघार घेतली नसल्याचे साक्षी मलिकने स्पष्ट केले. तिने नुकतेच रेल्वेमध्ये ओएसडी म्हणून काम सुरू केले आहे. साक्षी मलिकसोबत, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनीही रेल्वेत पुन्हा आपली ड्युटी सुरू केली आहे. साक्षी म्हणाली की, ‘आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो, ते सामान्य संभाषण होते, आमची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे त्यांना (ब्रिजभूषण सिंग) अटक करा. मी आंदोलनातून माघार घेतली नाही. मी रेल्वेमध्ये ओएसडी म्हणून माझे काम पुन्हा सुरू केले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे मला स्पष्ट करायचे आहे. आम्ही मागे हटणार नाही. तिने (अल्पवयीन मुलीने) एकही एफआयआर मागे घेतलेला नाही, अशा गोष्टी खोट्या आहेत. वाचा - Cricket News : आधी केली वादग्रस्त पोस्ट, नंतर मागितली माफी, गुजरातच्या खेळाडूने नेमकं काय केलं? ब्रिजभूषण सिंगवर गंभीर आरोप भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी एका अल्पवयीन कुस्तीपटूसह अनेक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ऑलिम्पियन कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट करत आहे. एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार अमित शाह यांनी कुस्तीपटूंना कायदा सर्वांसाठी समान असल्याचे आश्वासन दिले. वृत्तानुसार, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कुस्तीपटूंना सांगितले की, ‘कायद्याला आपलं काम करू द्या’. निष्पक्ष चौकशी करून त्वरित कारवाईची मागणी शनिवारी रात्री 11 वाजता ही बैठक सुरू झाली आणि तासाभराहून अधिक वेळ चालली. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट आणि सत्यव्रत कादियान यांनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील आरोपांची निष्पक्ष तपास आणि त्वरित कारवाईची मागणी केली. दिल्लीच्या जंतरमंतरवर 28 मे पर्यंत कुस्तीपटू निदर्शने करत होते. दरम्यान, नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत असताना दिल्ली पोलिसांनी त्यांची घरपकड केली होती.