बलिया (उत्तर प्रदेश), 25 ऑगस्ट : उत्तर प्रदेशमधील गुन्हेगार दिवसेंदिवस निर्भय होत चालले आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एक अशीच खळबळजनक घटना घडली. सोमवारी संध्याकाळी दुचाकींवरून जात असताना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला गोळ्या घालून ठार केले. रतन सिंह असे या पत्रकाराचे नाव आहे. ही घटना लुना पोलीस स्टेशनच्या परिसरातील आहे. या खूनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पत्रकारांमध्ये प्रचंड संताप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री गुन्हेगारांनी रतन सिंह यांच्या घराजवळ गोळी झाडली. पोलिस अधीक्षक देवेंद्र नाथ यांनी सांगितले की, एका वादातून आरोपींनी पत्रकार रतन सिंह यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर बलिया वर्किंग जर्नालिस्ट्स युनियनने सिंह यांच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाचा- ‘सरकारच्या या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू झाला’, शिवसेननं केला आरोप यापूर्वी 20 जुलै रोजी गाझियाबादच्या विजय नगर परिसरात गुन्हेगारांनी पत्रकार विक्रम जोशी यांना आपल्या मुलींसोबत स्कूटीवरून घरी परतत असताना गोळ्या मारून हत्या केली होती. दोन दिवसांनी विक्रम जोशी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दहा आरोपींना अटक केली आहे. वाचा- सराईत गुन्हेगार मित्र द्यायचा त्रास, ओंकारने घरामागेच खोदला खड्डा अन्…. मात्र उत्तर प्रदेशातील वाढती गुन्हेगारी याबाबत जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्याचबरोबर महिन्याभराच्या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये पत्रकाराची हत्या केल्याची ही दुसरी घटना आहे.