पाळीव प्राण्यांची योग्य काळजी घ्यावी आणि शहर स्वच्छ ठेवावं, यासाठी महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.
अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 8 जुलै : एखादा पाळीव प्राणी असेल तर घर कसं भरल्यासारखं वाटतं. असे अगदी क्वचित लोक असतात ज्यांना पाळीव प्राणी आवडत नाहीत, अन्यथा बऱ्याचजणांना घरात प्राणी असणं हवंहवंसं वाटतं, ते त्यांची आवडीने काळजी घेतात. तर, असेही लोक असतात ज्यांना प्राणी आवडतात पण त्यांची काळजी घ्यायचा कंटाळा येतो. मात्र आता असं करून चालणार नाही, कानपूरवासीयांना तर नाहीच नाही! कारण तेथील प्रशासनाने पाळीव प्राण्यांबाबत अतिशय कडक नियम जारी केले आहेत. उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या नागरिकांना आता घरात प्राणी बाळगणं चांगलंच महागात पडणार आहे. महापौर प्रमिला पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महानगरपालिकेच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यापैकीच एक म्हणजे घरात प्राणी पाळायचा असल्यास सुरुवातीला त्याची नोंदणी करणं अनिवार्य असेल. काही प्राण्यांसाठी नोंदणी शुल्कदेखील भरावं लागेल. तर, काही प्राण्यांच्या संख्येवरही मर्यादा आणण्यात आली आहे. एकदा का नोंदणी केली की, सदर प्राण्याचा मालक म्हणून तुम्हाला परवाना म्हणजेच लायसन्स मिळेल.
मांजर आणि कुत्रा हे दोन पाळीव प्राणी सर्वाधिक पसंतीचे मानले जातात. कानपूरमध्ये आता मांजरीच्या नोंदणीसाठी 300 रुपये मोजावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त विविध प्राण्यांसाठी विविध शुल्क आकारलं जाईल. तर, गायीच्या नोंदणीसाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही, मात्र नोंदणी करून एका घरात केवळ दोनच गायी पाळता येतील. तसेच मालकाशिवाय गाय रस्त्यावर एकटीच फिरताना दिसली, तर तिची मालकी महानगरपालिकेकडे जाईल आणि मूळ मालकाला दंडस्वरूपात मोठी रक्कम चुकवावी लागेल, शिवाय गाय त्याला परत मिळणार नाही. त्याचबरोबर गायीचं शेण नेण्यासाठी दररोज महानगरपालिकेची गाडी येईल. या गाडीव्यतिरिक्त नदी, नाल्यात, सार्वजनिक ठिकाणी कुठेही शेण दिसल्यास सदर गायीच्या मालकाला दंड आकारला जाईल. Mumbai News : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? ‘या’ मार्गावर असेल मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक दरम्यान, पाळीव प्राण्यांची योग्यरीत्या काळजी घेतली जावी आणि शहर स्वच्छ राहावं, यासाठी महानगरपालिकेने हा निर्णय घेतला असून नागरिकांना त्याची अंमलबजावणी करणं अनिवार्य केलं आहे.