मुंबई : कोरोनाचा काळ हा अत्यंत भयानक आणि सगळ्यांसाठी खूप कठीण होता. या काळात अगदी हातावर पोट असणाऱ्यांपासून ते उद्योजकापर्यंत प्रत्येकासाठी हा काळ जीवघेणा वाटणारा होता. कोरोनावर सुरुवातीला औषध नव्हतं अशावेळी आपली काळजी घेणं हा एकमेव मार्ग होता. पण कोरोनाची लस आली आणि बऱ्यापैकी गोष्टी मार्गी लागल्या. त्यात सर्वात मोठा हातभार हा कोरोनात 24 तास न थकता काम करणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करचा होता. अगदी देवमाणसासारखे हे सगळे धावून आले. कोणी त्यांच्यात देव पाहिला तर कोणी त्यांनाच देव मानलं. फ्रंटलाईन वर्कर्सना या कालावधीमध्ये एक वेगळ्या मानसिकतेशीही लढले आहेत. त्याचा हा संघर्ष आणि त्यांनी यावर केलेली मात TV 18 हिस्ट्रीने आपल्या माहितीपटातून सर्वांसमोर आणली आहे. जिथे रस्ते नाहीत, जाण्यासाठी अक्षरश: नदी, डोंगर पार करून जावं लागायचं अगदी अशा भागांमध्ये देखील खडतर प्रवास करून हे कर्मचारी कोरोनाची लस देण्यासाठी घरोघरी जात होते. वेगाने पसरणाऱ्या कोविड-19 साथीच्या आजाराविरूद्ध मोठ्या लोकसंख्येला लस देण्यासाठी देशाच्या दुर्गम कानाकोपऱ्यात पोहोचल्यानंतर तिथल्या लोकांच्या मनात असलेली कोरोना लसीची भीती काढून त्यांना ही लस देणं या मानसिकतेशी लढणं भाग होतं आणि ते काम या फ्रंटलाईन वर्कर्सने केलं. हिस्ट्री TV18 चा नवीन डॉक्युमेंटरी ‘The Vial – India’s Vaccine Story’ या डॉक्युमेंट्रिमधून असाच एक अनुभव त्यांनी सांगितला आहे. हिमाचल प्रदेशातील मालाना भागात व्यवस्थिती रस्ते नाहीत. अशा काही गावांमधील रहिवाशांच्या मनात लसीबद्दल मनात भीती होती. त्यामुळे ते लस घेण्यासाठी घाबरत होते. पार्वती खोऱ्यातील मलाना हे गाव अजूनही रस्त्याने दुर्गम आहे, पण आव्हान त्याहून मोठे होते. गावातील रहिवासी असा दावा करतात की ते अलेक्झांडर द ग्रेटचे वंशज आहेत आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी संस्कृती आहे. ते त्यांच्या स्थानिक देवतांवर विश्वास ठेवतात आणि बाहेरील लोकांकडे संशयाने पाहतात.
अशा ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना कोरोना लसीबद्दलची भीती घालवून ती देणं म्हणजे एक दिव्यच म्हणायला हवं. आपला अनुभव सांगताना, कुल्लू जिल्ह्याचे उपायुक्त आशुतोष गर्ग म्हणाले, “आम्हाला समजले मलाना गावाच्या विकासात मध्ये मागे आहोत, म्हणून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकार्यांसह संपूर्ण टीमने गावाला भेट देऊन लोकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मलाना येथील रहिवासी बाहेरील लोकांना फारसे स्वीकारत नाहीत आणि आम्हीही त्याला अपवाद नव्हतो. स्थानिक पंचायतीच्या मदतीनंतर, आम्ही त्यांना किमान आमचे म्हणणं पटवून दिले. त्यानंतर जेव्हा कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लस आणली तेव्हा लोकांनी ती घेण्यासाठी रांग लावली होती. एक एक करत 700 लोकांना लसीकरण करण्यात आलं. कोणीही मागे राहू नये हा आमचा उद्देश होता." अशी अनेक उदाहरणे अभिनेता मनोज बाजपेयी यांनी या डॉक्युमेंट्रिमधून सांगितली आहेत.