तेलंगणा, 23 जून : कोरोना लॉकडाऊनचा (corona lockdown) फटका कित्येकांना बसला आहे. अनेक कंपन्यांना नुकसान झाल्याने त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणं सुरू केलं. अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. अशीच वेळ ओढावली ती तेलंगणातील (telangana) एका शिक्षकावर (teacher). कोरोना लॉकडाऊनमध्ये त्याने आपली शिक्षकाची नोकरी गमावली आणि आता या शिक्षकावर डोसा विकण्याची वेळ ओढवली आहे. रामबाबू मारागनी असं या शिक्षकाचं नाव आहे. आपल्या पत्नीसह त्यांनी डोसा विक्री करणं सुरू केलं आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार रामबाबून तेलंगणातील खम्मम शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक होते. कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली आणि आता आपलं पोट भरण्यासाठी त्यांना डोसा विकावा लागतो आहे. रस्त्याशेजारी त्यांनी डोसा विक्रीची गाडी लावली आहे आणि यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यात त्यांची पत्नीही त्यांना साथ देते आहे.
विशेष म्हणजे शिक्षक असूनही डोसा विकणं हे रामबाबू यांना कमीपणाचं वाटत नाही, ‘कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे राहणं चांगलं’, असं ते म्हणाले. हे वाचा - कोरोनावर नियंत्रण मिळवणाऱ्या केरळचा दबदबा; ‘रॉकस्टार’ आरोग्यमंत्र्यांची UN वारी सोशल मीडियावर या दाम्पत्याचे फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर सर्वांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांच्या जिद्दीला सलाम केला.
या शिक्षकाचं कौतुक सर्वांनी केलं आहे. एक शिक्षक असून फूड स्टॉल चालवणं, यासाठी खरंच धैर्य लागतं, असं एका युझर्सने म्हटलं आहे. तर एकाने म्हटलं, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, हे या शिक्षकाने दाखवून दिलं. एकंदर सर्वांनी या शिक्षकाबाबत अभिमान व्यक्त केला आहे. संपादन - प्रिया लाड