शरद पवारांचे कर्नाटकात आवाहन
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी निपाणी, 8 मे : भाजप सरकार पैशाचा वापर करुन आमदार फोडून सरकार आणत आहेत. याला कर्नाटकही अपवाद नाही. पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला ठेवा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार आज बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. कर्नाटक विधानसभा प्रचार सभेच्या निमित्ताने शरद पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारात निपाणी इथं जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शरद पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत जाहीर सभेला संबोधित केले. याच मतदारसंघाच्या प्रचार सभेत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवीत राष्ट्रवादीची भाजप सोबत बोलणी सुरू असून राष्ट्रवादी आमच्या सोबत किती दिवस राहील हे सांगता येत नाही, असं वक्तव्य केले होते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार शशिकला जोले याच्या प्रचार सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असल्याचा टोला लगावला होता. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार या सभेतून घेण्यात आला.
काय म्हणाले शरद पवार? आपला देश तीन चार भागात विभागाला आहे. चीन सारखा बलाढ्य देश वाकड्या नजरेने बघतोय. मणिपूरमध्ये गेले सहा दिवस संघर्ष सुरू आहे. 54 विद्यार्थी तिथे मृत्युमुखी पडले. ज्यांच्या हातात देश आहे त्यांना मणिपूर सारखे राज्य सांभळता येत नाही. सत्तेचा वापर करून मणिपूर कसे वाचवता येईल त्यासाठी पराकाष्ठा करा, असे आवाहन पवार यांनी भाजपला केलं आहे. भाजप आमदार फोडून सरकार आणत आहेत. कर्नाटकमध्येही त्यांनी हेच केलं. पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला ठेवा, असंही पवार म्हणाले. वाचा - ‘राज्यात भ्रष्टाचार बोकाळलाय, बदल्यांमध्ये रेट..’ अजित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले आम्ही सत्तेचा माज.. शेतकऱ्यांसाठी आश्वासन मुंबईत कर्नाटकातील लोक राहतात. ते म्हणतात राज्यात सध्या 40 टक्केची चर्चा सुरू आहे. मिळालेली सत्ता ही सामान्यांच्यासाठी वापरायची असते. कर्नाटची चर्चा 40 टक्के म्हणून होत असेल तर इतकी बदनामी कर्नाटची पूर्वी कधी झाली नाही. 14 एप्रिल हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे. मात्र, इथे कॅलेंडरमध्ये अशुभ दिवस लिहला जातो, काय चालले आहे हे? बाबासाहेबांच्यामुळे मी इथं उभा आहे. वीज आणि पाणी याचे धोरण बाबासाहेबांनी मांडले होते. भाकरा नांगल धरणांची सुरुवात आंबेडकर यांनी केली. पंजाब हरियाणाला याचा फायदा झाला. एवढ्या मोठ्या नेत्यांचा जन्मदिवस अशुभ मानत असल्याची टीका पवारांनी केली. यावेळी ऊसाला या क्षेत्रात ज्यादा किंमत देण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करेल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिलं आहे.