राहुल गांधी शेतात राबले, शेतकऱ्यांनी घरून आणलं जेवण; असा होता मेन्यू
सोनीपत, 8 जुलै : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील गोहाना येथे जाऊन शेतकऱ्यांसोबत शेतात काम करत त्यांच्याशी संवाद साधला. सध्या राहुल गांधींच्या यादौऱ्याचे फोटो व्हायरल होत असून ते शेतात ट्रॅक्टर चालवताना, भात लावताना, शेतकऱ्यांसोबत बसून गप्पा मारताना दिसत आहेत. राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला आल्यावर त्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या घरातून स्वादिष्ट भोजन आणले होते. मदिना गावात पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी केवळ भाताची लागवडच केली नाही तर शेतकऱ्यांसोबत बसून नाश्ता करण्याचा आनंद देखील घेतला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या गावात पोहोचल्याचे गावकऱ्यांना समजताच सारिका नावाच्या मुलीने त्यांच्यासाठी घरून जेवण आणले. राहुल गांधींना नाश्त्यात डाळ आणि रोटीसोबत लस्सी देण्यात आली. राहुलने गावकऱ्यांसोबत बसून ते खाल्ले आणि मनापासून कौतुक देखील केले. याशिवाय राहुल गांधींनी त्यांची बहीण प्रियंका गांधी यांच्याशी संपर्क करून देण्यासाठी सर्व महिलांना एकत्र बसवले.
राहुल गांधींसाठी नाश्ता घेऊन आलेल्या मुलीने सांगितले की, राहुल गांधी गावातील महिलांशी बोलले, त्यांनी महिलांच्या दिनक्रमाबद्दल विचारले. तसेच त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते याची माहिती घेतली. शनिवारी सकाळी दिल्लीहून शिमल्याला जात असताना राहुल गांधी अचानक सोनीपत जिल्ह्यातील गोहानाच्या बडोदा हलके आणि मदिना गावात पोहोचले. राहुल गांधी यांच्या येथे आगमनाबाबत जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. येथे राहुल गांधी यांनी शेतकरी आणि मजुरांसोबत शेतात भात लावणीचे काम केले आणि ट्रॅक्टरही चालविला. राहुल गांधींना पाहून शेतकरी आणि ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले होते. यावेळी राहुल गांधींनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आणि दैनंदिन दिनचर्येची विचारपूस केल्याने शेतकरी आनंदले होते.