कोरोमंडल एक्सप्रेस अपघात
बालासोर, 3 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहंगा येथे रेल्वे अपघातस्थळाची पाहणी केली. यावेळी रेल्वे अपघतातानंतर सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला. पंतप्रधानांसोबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान होते. दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ते फोनवर बोलताना दिसत आहे. त्यांनी दोन अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. घटनास्थळी पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत केली जाईल याची खात्री करण्यास सांगितले. पीएम मोदींनी शोकग्रस्त कुटुंबांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घेण्यास सांगितले. या दोन अधिकाऱ्यांशी केली चर्चा पंतप्रधानांनी ओडिशाच्या महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री प्रमिला मलिक तसेच स्थानिक पोलीस प्रमुख यांच्याशीही चर्चा केली. अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचीही मोदींनी माहिती घेतली. घटनास्थळाची पाहणी आणि हॉस्पिटलमध्ये पीडितांची भेट घेतल्यानंतर पीएम मोदींनी मीडियाला सांगितले की, “रेल्वे अपघातात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” कुणालाही सोडले जाणार नाही.’’ तसेच जखमींना आम्ही सर्वोत्तम उपचार देऊ, असेही ते म्हणाले.
पीएम मोदींनी मदतीसाठी पोहोचलेल्या लोकांचे मानले आभार लोकांना वाचवण्यात मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी स्थानिक लोकांचे आभार मानले, ज्यापैकी अनेकांनी रात्रभर काम केले. पीएम मोदी म्हणाले, ‘रेल्वे अपघातग्रस्तांना केलेल्या सर्व मदतीबद्दल मी स्थानिक लोकांचा आभारी आहे.’ या अपघाताबाबत ते म्हणाले, ‘माझ्या वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. देव आम्हाला या परिस्थितीवर मात करण्याची शक्ती देवो. वाचा -
Train Accident : आज ‘कवच’ असते तर टळला असता अपघात? वाचा कशी काम करते ही टेक्नॉलॉजी बाहानगा बाजार येथील अपघातस्थळी पोहोचण्यापूर्वी पंतप्रधानांनी रेल्वे अपघाताबाबत नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ट्विट केले की, ‘ओडिशातील रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. आढावा बैठकीत बाधित लोकांच्या बचाव, मदत आणि वैद्यकीय उपचारांशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली. 288 प्रवासी ठार, 800 हून अधिक जखमी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने आणि बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मालगाडीला झालेल्या धडकेतील मृतांची संख्या शनिवारी 288 वर पोहोचली. देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या या अपघातात 800 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 56 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर 747 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताबद्दल दुःख व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी 50,000 रुपये अतिरिक्त मदत जाहीर केली. त्याच वेळी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील भीषण रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर शनिवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.